पुण्यातल्या प्रत्येक घरात दुचाकीचे कौतुक असते. अशा प्रत्येक घरात सरसरी दोन दुचाकी दिसतात असे शहर म्हणजे पुणे. फार वर्षांपुर्वी सायकलींचे शहर म्हणुन प्रसिद्ध होते पुणे. आता मात्र ते स्वयंचलीत दुचाकी शहर बनले आहे. त्या शहरातल्या माझी ही ओढ दुचाकीसाठीची. स्वतंत्र भागात लिहितोय कारण तुम्हाला वाचायला बरे पडेल आणि मला लिहायला पण. या तुम्हीपण बघा मी शोधतोय माझी दुचाकी... बहुतेक तुम्हालाही सापडेल तुमची.
इसवी सन १९९७, ऑगस्ट महिना, मु.पो. पुणे.
"हे बघ ही लुना माझ्या कमाईत घेतलेली पहिली वस्तु आहे, आता मी ती वापरत नाही म्हणुन काय झाले? जरा जपुन वापर तीला." भाऊजी धमकी-वजा विनंती करत म्हणाले.
माझ्या त्या पादचारी किंवा सायकलारूढ जगात प्रत्येक वाहनधारक हा "भाईगिरी" करत होता. या जगात माझा जन्म हा इतरांना कोणीतरी झापायला मिळावा म्हणुन झाला आहे असे मला कायम वाटते. अरे जो येतो तो मोठेपणा गाजवतो. पण काय करणार दुसऱ्याची लुना जर मला फुकट वापरायची असेल तर असे सगळे ऐकुन घ्यावे लागते. तसे ते प्रेमळ आहेत, मला पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महविद्यालयात (COEP हो!) प्रवेश मिळाल्यावर दोन वर्षे झाली पण माझ्या कठोर पालनकर्त्यांना गाडीचा पाझर फुटत नाही म्हटल्यावर माझ्या मेव्हण्याने त्यांच्या छातीवर दगड ठेऊन मला त्यांची ताईपेक्षा लाडकी लुना मला दिली होती. आता माझ्या किर्तीप्रमाणे मी तिची थोडीफार वाट पण लावली होती. आता सांगा, COEP च्या विद्यार्थी भांडारात वस्तु जशा सरकारी subsidy-ने मिळतात, तसे त्यांनी पेट्रोल पण का विकु नये? दरमहा आईकडुन खर्चाला मिळणाऱ्या तुटपुंज्या पैशात मी पण काय काय करणार? सारी हातखर्चाची रक्कम पेट्रोलमध्येच संपायची आणि तरी बरेचदा पेट्रोल मध्येच संपल्याने लुनाची सायकल व्हायची, मग तीच्या दुरुस्तीला पैसे आणायचे कोठुन? आणि म्हणे नीट वापर.
"हो, परत करताना नवीन बनवुन देईन तुमच्या खटाऱ्याला" मी उत्तरलो, "पण कमवायला लागल्यावर बरं का".
"अरे, परत नको देऊस वाटले तर पण आत्तातरी नीट वापर", जवळपास निरुत्तर झालेल्या भाऊजींनी परत झापले.
***************************************************************
आकाशच्या मोठ्या भावाचे लग्न होते. स्वागत सभारंभाच्या चमचमीत जेवणानंतर बरीच कलाकार मंडळी खुप दिवसांनी रंगात आली होती. रात्री उशीरा आम्ही इतरांच्या डोक्याचा "चहा" करत होतो... आणि मुक्त कट्टा. चेष्टा बहरात आलेली... रात्रीच्या अंधारात लोचा-पोचा झालेला पुना क्लबच्या पोर्च आमच्या हसण्याने घुमत होता. आम्ही वऱ्हाडी असल्याने रखवालदार पण गप्प होता. खरे तर आमच्यातल्यांनी त्याच्या बिडीकाडीची सोय केल्याने तो खुष होता.
"अरे पकलोय यार", आशिष उभा होत म्हणाला.
"बरं मगं? थांब थोडा वेळ पडशील खाली आपोआप", राहुलने त्याच्याकडे न बघताच त्याला उधळला.
"अरे मी काय पेरू आहे, पिकलो की पडायला", कावलेला आशिष.
"नाही चिक्कू आहेस, चल पैसे काढ बिलाचे", त्याचे सांत्वन करणारा केरी
"अरे चला सिंहगडावर चहा-भजी खायला जाऊ", जयदीप डोक्यात दीप लागल्यासारखा ओरडला.
"याला कोणी पाजली रे, येडा झालायस का रे? एक वाजलाय आता.." आशिषचा नेहमीचा अतिशहाणपणा ...
रात्रीच्या एक वाजता गडावर जाऊन भजी खायची कल्पना कितीही मुर्खपणाची असली तरी आशिष नाही म्हटला म्हणजे झाले आम्ही सहा-सात जणं मनात बंगाळांच्या जयदीप नामक नक्षत्राला कोसत.. तयार झालो, त्या भज्यापेक्षा पडलेला आशिषचा चेहरा लोकांना जास्त महत्वाचा वाटत होता.
"ए, मी आज वडीलांची बाईक आणलीये... ती घेऊन मी काही येणार नाही, माझी आणतो जरा माईलेज कमी आहे पण तुम्ही उदार लोक स्वतःच्या गाडी पेट्रोल भरताना माझ्याही भरालच" आमचा केरी म्हणजे... त्याच्याविषयी आज सांगायला नको, या पात्रावर मी PhD करण्याचा विचार करत आहे.
"हो आमचे आईबाप कुवेतचे आहेत ना ... " मी बोंबललो
"हो का? अरे माझ्या कायनेटिक मध्ये पण एखाद दुसरा लिटर भर मग", राहुल
"अरे चालतीये का आधी ते बघ", मी मुद्द्याचे बोला असा आव आणला.
"ब्रेक थोडा जास्त दाबावा लागतोय आणि हॉर्न हवा असेल तर मागच्याला कोपर मारावे लागते, दिव्याचे असे आहे की तु खापरेंचा दिवा आहेसच.." राहुलने आपल्या छडमाड कायनेटिकचे कौतुक सांगितले.
"विशाल ती तर तुच चालवणार आहेस, नाही तरी तुझी लुना काही चढणार नाही", केरी उगाच उवाच.
"त्या जयदीपची घ्या की, बोलताना काही वाटले नाही बरे", चंद्या त्याच्या गाडीचा विषय निघु नये म्हणुन.
"मी केरीच्या मागे बसणार, चला स्वारगेटचा पंप उघडा असतो रात्रभर, स्टॅंडावर तुमच्या धुरनळ्यांची पण सोय होईल " निहारने त्याच्या बुडाची निश्चिंती केली.
"अरे तो स्वारगेटचा, पेट्रोल कमी आणि रॉकेल जास्त घालतो" जयदीपला शिव्याखायची सवय असल्याने कारण देण्यासाठी बरळला.
"फुकण्या, त्या आशिष समोर बोलताना नाही आठवले का रे? आता भज्याचे पैसे भरणार आहेस हे लक्षात ठेव" केरी खेकसला.
सगळा जामानीमा करुन आमच्या टोळक्याने सिंहगडावर चढाई केली अर्थात गाडीवरून. चांगल्या दिव्याची पुढे आणि त्याच्या उजेडात इतर असे आम्ही पोहोचलो. पहाटे ४ वाजता गडावर आलेल्या या वटवाघळांना तेथे गरम चहा-भजी मिळाली. तिथल्या टपरीवाल्याला उठवावे लागले नाही. जोरात गोंधळ, विचित्र आवाज करणाऱ्या गाड्या त्याची गरम घोंगडीतली झोप उडवायला पुरेशा झाले. त्या पहाटेच्या भज्यांची चव अजुनही जीभेवर आहे. त्यानंतर गडावर मी अनेकदा गेलोय, पण काही म्हणा आता ती भजी काही मिळत नाहीत.
(या अंकातील संवाद बऱ्याच वेगळ्या शब्दकोषाच्या अनुशंगाने झालेले असल्याने त्या शब्दांना गाळुन अथवा सौम्य भाषेत मांडताना माझी फारच कसरत झाली आहे. त्यामुळे अनेक बारकावे न साकारल्याबद्द्ल क्षमस्व.)