पुण्यातल्या प्रत्येक घरात दुचाकीचे कौतुक असते. अशा प्रत्येक घरात सरसरी दोन दुचाकी दिसतात असे शहर म्हणजे पुणे. फार वर्षांपुर्वी सायकलींचे शहर म्हणुन प्रसिद्ध होते पुणे. आता मात्र ते स्वयंचलीत दुचाकी शहर बनले आहे. त्या शहरातल्या माझी ही ओढ दुचाकीसाठीची. स्वतंत्र भागात लिहितोय कारण तुम्हाला वाचायला बरे पडेल आणि मला लिहायला पण. या तुम्हीपण बघा मी शोधतोय माझी दुचाकी... बहुतेक तुम्हालाही सापडेल तुमची.
इसवी सन १९९३, ऑगस्ट महिना, मु.पो. पुणे.
मी अजुन सायकल लावत होतो तर आईनं विचारलं, "काय रे, लवकर आलास? तु तर म्हणालास की सात वाजतील म्हणून आणि तुझं कॉलेज कसं आहे?"
"अगं, कॉलेज एकदम झकास आहे, खुप मोठं आहे, अगं पण सायकल एकदम कोपऱ्यात लावावी लागते, सायकल तळ एकदम लहानसा आहे"
"तु नक्की फर्गुसनलाच गेला होतास ना रे? ", दारात पाय अजुन आत टाकत ताई म्हणाली. आमच्या भगिनी अशा नेमक्या वेळी कशा टपकतात कोण जाणे, आणि तीला मध्ये मध्ये चोंबडेपणा करायला काय जातेय.
"तुझे काय माहीतीये, सायकल चालवुन बघ तिथं, मग कळेल, सगळे जण गाड्यांवरच येतात, सायकल तळ पुढच्या वर्षी काढुन टाकणार आहेत म्हणे", आईकडे बघत म्हणालो, "आई, मला पण कायनेटिक होंडा हवीये."
"माझे ऑफिस पण फर्गसन रस्त्यावरच आहे समजलं? फर्गसनमध्ये बरेच जण सायकलीवर येतात. तुला अकरावीत गाडी कशाला हवी? पोरींवर इंम्प्रेशन मारायला?"
"आता बास, तुमचं कधी संपेल तर नशीब", आई दरडावत म्हणाली, "रावसाहेब, तुम्ही जरा अभ्यासात लक्ष जास्त द्या, अकरावी ही बारावीचा पाया असते. नीट पास झालास तर तुम्हाला पण गाडी घेऊ आपण आणि तु गं कधी कधी विशालला तुझी लुना चालवायला देत जा. आणि आता चला, जरा स्वच्छ व्हा, भुका लागल्यात ना?".
आईने टाकलेली अट माझ्याकडुन पुर्ण होण्याची अपेक्षा मला अजिबात नव्हती. वैशाली-सवेरामध्ये जर वर्ग भरला तरच सगळे जण वर्गात असणार अशी तर आमच्या वर्गाची परिस्थिती. मला अकरावी-बारावीची दोन्ही वर्षे माझ्या सायकल-महोत्सव म्हणुन साजरी न करावी लागली तरच आश्चर्य. अकरावीला जेमतेम ५१% मिळवुन नव्हे तर पाडुन आम्ही बारावीत शिरलो आणि गाडीला किक मारुन जाण्याचे माझे स्वप्न मी सायकलवर टांग मारुन बघत राहीलो.
कधी कधी ताईची लुना "लायसेंस नसताना" पण कॉलेजात घेऊन जायचो, पण वर्गातल्या मुलामुलींमध्ये ९०% जण गाडीवर येत असल्याने, माझी आणि त्या जुनाट लुनाची किम्मत गॅस उडुन गेलेल्या सोडापेयापेक्षा जास्त नसावी. अहो एकदा येताना पेट्रोल संपले, पण भरायला पैसे हवेत ना? मग काय, लुनाच्या मागच्या चाकाजवळचा खटका आत दाबुन लुनाची सायकल केली आणि घरी येऊन ताईची मंत्रपुष्पांजली ऐकली. नशीबापुढे काय चालतंय का कुणाचे, लुना वापरली ती पण बरेचदा सायकल करुनच.
No comments:
Post a Comment