पुण्यातल्या प्रत्येक घरात दुचाकीचे कौतुक असते. अशा प्रत्येक घरात सरसरी दोन दुचाकी दिसतात असे शहर म्हणजे पुणे. फार वर्षांपुर्वी सायकलींचे शहर म्हणुन प्रसिद्ध होते पुणे. आता मात्र ते स्वयंचलीत दुचाकी शहर बनले आहे. त्या शहरातल्या माझी ही ओढ दुचाकीसाठीची. स्वतंत्र भागात लिहितोय कारण तुम्हाला वाचायला बरे पडेल आणि मला लिहायला पण. या तुम्हीपण बघा मी शोधतोय माझी दुचाकी... बहुतेक तुम्हालाही सापडेल तुमची.
इसवी सन १९९८, सप्टेंबर महिना, मु.पो. पुणे.
संध्याकाळी साडेपाच वाजले होते, वडील नुकतेच कामावरुन येत होते, अजुन त्यांनी बजाज सुपर स्टॅंडवर पण लावली नव्हती, तोच मी पळत वाड्यात आलो.
मला त्यातल्यात्यात पांढरट शर्ट, थोडीशी गडद पॅंट आणि बुट घातलेले बघुन, डॅड (आजकाल मी वडिलांना डॅड म्हणत होतो) म्हणाले,
"आजकाय विशेष?"
"मी स्कुटर घेऊन जाऊ?"
"पण आज स्वारी कुठे? PL शिवाय अभ्यास कधीच करु नये असे काय विद्यापीठाने सांगितले आहे का?"
"मी अभ्यास करतो हो, तुम्हाला दाखवुन करत नाही इतकेच आणि मार्क्स मिळतात ना बस्स? आणि मला कॉलेजात जायला उशीर होतोय, मी जाऊ"
खरे तर मी आता BCS च्या एका क्लासमध्ये अर्धवेळ गणित शिकवत होतो. तिसऱ्या वर्षाच्या परीक्षेच्या दिवसात दुपारी परीक्षा देऊन संध्याकाळी शिकवायचो. तरीसुध्दा मी विद्यापीठात सातवा-आठवा आलो असल्याने घरचे सगळे माझ्यावर जरा खुष होते.
"तुकाराम महाराज म्हणाले आहेत ना की जास्त मार्क्स मिळवुन कोणाचे भले झाले आहे? मला उशीर होतोय मी स्कुटर नेऊ का ते सांगा"
"हे आता तुकाराम महाराज कधी म्हणाले? आजकाल तुला साक्षात्कार पण होतात वाटतं.... आणि तुझ्या लुनाला काय झाले?"
"अहो ते मीच म्हटलंय, पण तुकाराम महाराजांच्या नावाने जरा वजन वाढतं, आणि ते गांधीजींनी नाही का आपल्या नाटकात लिहिलंय की 'नावात काय आहे?' म्हणुन... आणि माझ्या लुनात पेट्रोल थोडे कमी आहे."
"वाह रे वाह, ते शेक्स्पीयरने लिहिलंय"
"तेच ते हो!! शेवटी 'नावात काय आहे?'" असं म्हणत मी स्कुटरला किक पण मारली, "आणि तुम्हाला सागितलेच नाही ना, मी टाटा इंफोटेकच्या Campus interview च्या पहिल्या फेरीत पास झालो आता शेवटची मुलाखत आहे, तिथेच निघालोय"
"गाडी फार वेगात चालवतोस तु, सावकाश जा रे", वडिलांचे वाक्य संपेपर्यंत मी नक्की फडगेट पार केली असेन.
रात्रीचे दहा वाजायला आले होते, गाडी लावली आणि आत आलो.
आई : "काय रे काय, झाले तुझ्या मुलाखतीचे?"
हातातले पत्र झळकावत मी भसाड्या स्वरात गायला लागलो "अपनी तो निकल पडी, अपनी तो निकल पडी, अपनी तो निक्कssल पssडी".
"अहो पेशवे, इतर लोक झोपलेत, जरा हळु आणि इतक्यात काही पगार मिळत नाही, कामाला पुढच्या वर्षी लागणार ना, मग?"
(या अंकातील संवाद बऱ्याच वेगळ्या शब्दकोषाच्या अनुशंगाने झालेले असल्याने त्या शब्दांना गाळुन अथवा सौम्य भाषेत मांडताना माझी फारच कसरत झाली आहे. त्यामुळे अनेक बारकावे न साकारल्याबद्द्ल क्षमस्व.)
No comments:
Post a Comment