पुण्यातल्या प्रत्येक घरात दुचाकीचे कौतुक असते. अशा प्रत्येक घरात सरसरी दोन दुचाकी दिसतात असे शहर म्हणजे पुणे. फार वर्षांपुर्वी सायकलींचे शहर म्हणुन प्रसिद्ध होते पुणे. आता मात्र ते स्वयंचलीत दुचाकी शहर बनले आहे. त्या शहरातल्या माझी ही ओढ दुचाकीसाठीची. स्वतंत्र भागात लिहितोय कारण तुम्हाला वाचायला बरे पडेल आणि मला लिहायला पण. या तुम्हीपण बघा मी शोधतोय माझी दुचाकी... बहुतेक तुम्हालाही सापडेल तुमची.
इसवी सन १९९९, सप्टेंबर महिना, मु.पो. पुणे.
"आई, उशीर होतोय, डबा तयार आहे का?"
"डबा कधीचा तयार आहे, पण तुझं आवरलंय का? अरे छत्री घे पाऊस पडेलसं वाटतय आज."
"डॅड, जाताजाता मला स्कुटरवरुन शिवाजीनगरला सोडा ना... pleeeeeessseee"
"चिरंजीव, आता स्वतःची गाडी घ्या..... किती दिवस अशा लिफ्ट मागत फिरणार आहात? आणि लवकर आवरले तर भोसरीपर्यंत सोडेतो"
वडिलपण भोसरीलाच काम करायचे, पण त्यांच्याबरोबर एवढ्या लांब जायचे म्हणजे आज करीअर याविषयावर खुप ऐकावे लागणार म्हणुन मी ती सुविधा नाकारली. कंपनीची बस परवडली असे वाटायचे.
माझी लुना आता कधीच मागे पडली होती. नव्या गाडीची स्वप्ने बघत होतो. नक्की काय घ्यायचे हे अजुन कळत नव्हते.
इसवी सन १९९९, ऑक्टोबर महिना, मु.पो. पुणे.
कोणते काम होते आठवत नाही पण शनिवारी संध्याकाळी वडिलांच्या बरोबर ताई कडे गेलो होतो. अजुनही आमची गाडी काही आली नव्हती त्यामुळे अजुनही "हमारा बजाज" मी चालवत होतो. वडिल मागे बसले होते. आताच्या सारखा शिवाजी रस्ता एकमार्गी नव्हता, शनिवार वाड्यावरुन सरळ डावीकडे वळुन तुम्हाला शुक्रवाराकडे जात होतो, त्यामुळे लाल महालाकडुन येणाऱ्या गाड्या अगदी जीवाच्या आकांताने चढण चढत होत्या. अगदी उतार वयात आलेल्या आजोबांनी जीना चढावा अशी गाड्यांनी अवस्था झाली होती. मी मात्र लकडी पूलावरुन येत असल्याने आमची "बुलंद तस्वीर" (म्हणजे बजाज हो!) उतरत होती.
उतारावरुन आल्याने वाढलेला वेग कमी न करताच मी शनिवार वाड्याच्या पुर्व बुरुजाला वळसा घालुन लाल महालासमोरच्या चौकात आलो. लाल दिवाबघुन कर्कचुन ब्रेक मारला. ब्रेकच्या ऒढ्याने पुढे खेचले गेलेले वडिल लगेच माझ्या खांद्याचा आधार घेत म्हणाले, "सावकाश".
"अहो असे मध्येच विचित्र दिवे लावल्यावर काय"
"दिवाबरोबर आहे, तु फक्त बघितला नाहीस इतकेच", निरुत्तर मी हिरव्या दिव्याची वाट बघत होतो.
पहिल्या गियरवर आणण्यासाठी बोटांनी क्लच दाबुन धरला आणि मनगटातल्या सगळ्या जोराने डावे हॅंड्ल वर उचलले, खट्ट असा आवाज करुन गाडीने पहिला गीयर पडला याची पावती दिली. मधुनच "हमारा बजाज" बंद होऊ नये म्हणुन हलकेच रेज करत होतो, तोच मागुन जोरात भोंगा वाजला, मागे बघतोय तोवर "PMT च्या बसमध्ये भोंगाच फक्त हवातसा आवाज करतो" हयाची मला आठवण व्हावी म्हणुन त्या बसच्या चालकाने अजुन एकदा कर्णकर्कश्य ध्वनीयंत्र वाजवले. मी अजुनही काय झाले याचाच विचार करत होतो, बहुतेक मला नाही म्हणुन परत हिरव्या दिव्याची वाट बघु लागलो तोच मागे PMT चा चालकाने त्याच्या खिडकीतुन हात बाहेर काढला होता, आणि मला "आता चला" असा इशारा करत होता.
दिवे लाल असताना कसे जायचे, त्याला मी पण दिवा दिसत नाही का असे दर्शवले.
आता मात्र त्या बस चालकाने डोके बाहेर काढले होते, "ए, अरं चल की, कोण नाय रस्त्यावर मग कशाला दिव्यासाठी थांबतोस?".
"अहो, मला कसली घाई आहे, मी थांबणार तुम्हाला काय त्रास आहे"
"अरं मला आहे ना पण", थोडासा सातारी गावाकडच्या मराठीची लकब आवाजात होती.
"मग घेऊन जा की बस वरनं, अगदी प्रवाशांना पण बसच्या तिकीटात विमान प्रवास करायला मिळेल"
"जरा स्कूटर घे बाजुला, मी जातो" तो आता वैतागला होता.
इतर दुचाकीवाले ही मजा बघत होते. बघ्यांची कधीच कमी नसते. दिव्याला उभे असताना विना-तिकीट मनोरंजन.
"अहो श्रीमंत, थांबा की जरा", वडिल म्हणाले.
आता मात्र चालक उचकला होता. त्याने बळेच बसच्या इंजिनचा घुऱ्र्ऱ्ऱ्ऱ्ऱ्र घुर्मऱ्ऱ्ऱ असा आवाज करवला. मी पण पेटलो होतो, वडिलांना उतरायला सांगितले आणि स्कुटर स्टॅंडवर चढवली, त्याच्या बस कडे तोंड करुन उभा राहीलो, "काय हो या खाली, रहदारीचे नियम आज माझ्याकडुन शिकायचे आहेत का?", आता मात्र माझा आवाज वाढला होता.
मला नक्की माहीत होते की तो काही उतरणार नाही, कारण त्याला Accelerator वर पाय ठेवुन रहावे लागणार होते. जर तो PMT चा खटारा बंद झाला तर काय करा.
तेवढ्यात हिरवा दिवा पडला, आजुबाजुचे दुचाकीवाले जशा मुंग्या लगबगीने कामाला जातात तसे निघु लागले.
"अरे बाबा आता तरी चल की" चालक कळवळला. माझ्या पोकळ धमकीला नाही तर त्याच्या सवयीत न बसणाऱ्या "हिरव्या दिव्याची वाट पहाणे" या प्रकाराला तो कंटाळला होता.
मी गाडी बाजुला घेतली आणि त्याला जागा दिली, बस पुढे जात असताना पुढच्या सीट्वरचे प्रवासी माझ्याकडे वेगळ्या नजरेने बघत होते.
बस गेल्यावर वडिल म्हणाले, "जे केलेस ते बरोबर होते, पण करायची पद्ध्त चुकली".
"अहो पण माझ्या ओरडण्यामुळे त्या पाच-पन्नास बघे जमा झाले, त्यांच्यापैकी एकालाही आज त्या चालकामध्ये काही चूक दिसली नाही, कदाचीत उद्या त्याच्यातल्या एकाने जरी नियम तोडायला नकार दिला तर आजची माझी आरडाओरड कामी येईल ना?"
वडिल बघत होते, मी शांतपणे गाडी काढली. स्कुटरची कीक मारुन आम्ही बसलोच होतो तोच लक्षात आले की दिवा परत हिरव्याचा लाल झाला होता.
आणि मी पुन्हा हिरव्या दिव्याची वाट बघत होतो......
No comments:
Post a Comment