दुचाकीच्या शोधात.. भाग १

पुण्यातल्या प्रत्येक घरात दुचाकीचे कौतुक असते. अशा प्रत्येक घरात सरसरी दोन दुचाकी दिसतात असे शहर म्हणजे पुणे. फार वर्षांपुर्वी सायकलींचे शहर म्हणुन प्रसिद्ध होते पुणे. आता मात्र ते स्वयंचलीत दुचाकी शहर बनले आहे.  त्या शहरातल्या माझी ही ओढ दुचाकीसाठीची. स्वतंत्र भागात लिहितोय कारण तुम्हाला वाचायला बरे पडेल आणि मला लिहायला पण. या तुम्हीपण बघा मी शोधतोय माझी दुचाकी... बहुतेक तुम्हालाही सापडेल तुमची.

इसवी सन १९८८, फेब्रुवारीचा महिना, मु.पो. पुणे.
ताई पटकन खेकसली, "तुला मी सांगितले होते ना, माझ्या सायकलीला हात लावु नकोस म्हणुन, खरचण्यावर भागले, हात पाय मोडला असता म्हणजे.., जा जरा पाय धुऊन घे."

"मला काही झालेले नाहीये", पायावरच्या लाल रेघा लपवत मी म्हणालो.

"आईSS, ह्याने माझी सायकल पुन्हा पाडली बघ, पुढचं चाकपण वाकडे करुन आणले आहे यावेळी"

"आईने मला सायकल घेऊन दिली की मी पण तुला हात लावु देणार नाही", मी उसने अवसान आणुन ओरडलो. 

"नको मला तुझी सायकल, त्यावेळी माझ्याकडे लुना असेल, मग नको मला लिफ्ट मागुस.."

"हॅहॅहॅ, तोंड बघितलंय का आरशात, लुना चालवायला त्याला लायसेंस लागते आणि त्यासाठी गाडी चालवायची परीक्षा द्यावी लागते.."

"पाहीलंय बरं, छानच आहे मी आणि माझं तोंड, आणि परीक्षा पण देईल की"

"बाई, पण पास झालात तर... हो हो हो", रामानंद सागर निर्मित रामायणात विजय अरोराने (इंद्रजीतने) लंका जाळणाऱ्या दारासिंगला पकडुन आणल्यावर अरविंद त्रिवेदी म्हणजे रावण जसा हसला, तसे काहीतरी हसत मी पळालो.

खरे तर, शुक्रवारात राहणाऱ्याला नूमवित शिकण्यासाठी सायकल म्हणजे चंगळच होती, पण ताईची जुनी सायकल आता हळुहळु माझी झाली होती, "लेडिज" का असेना, पण सायकल होती. मला स्वतःची  सायकल मिळायला दहावीचे वर्ष उजाडले.  दातार क्लास आणि शाळा यात वेळ वाचेल, माझी नेहमीची जुन्या सायकलची कुरकुर पण थांबेल म्हणुन तीर्थरुपांनी सायकलला मंजुरी दिली आणि आमच्या वाड्यात हिरो रेंजर ए. टि. बी. येऊन लागली.

Vishal Khapre

3 comments:

Shantanu said...

Is it red colored????

Vishal Khapre said...

नाही हो, माझ्यासारखाच आहे... काळा!!

Anonymous said...

lage raho vishal !!!