विचीत्र कल्पना

अशी कल्पना करू यात कि, या पृथ्वीवरून भारतातून एक शहर एकदम गायब झाले आहे. सकाळी त्या ठिकाणी काहीही नाही फक्त मोकळी जमीन आहे. तेथील माणसे, पशु, पक्षी, घरे, सर्व सर्व काही एका रात्रीत गायब झाले. कोणालाच माहित नाही. कोठे गेले कोणालाच माहीत नाही. अगदी त्या ठिकाणी वाळवंट. थोडी कल्पना करा दिवाळीत मुले किल्ला करत्तात,  आपण  संध्याकाळी तो पाहून, त्याचा फोटो घ्यावा,अगदी एक शहरच मुले बनवतात ना. सकाळी  उठून पहावे तर त्या ठिकाणी काहीही नाही फक्त मोकळी जमीन. कसे वाटेल. मग पळत जाउन कालचा फोटो पहावा तर त्या फोटोतूनही तो किल्ला गायब. तसेच या शहराबद्धल झाले. खूप चर्चा झाली, तर्कवितर्क झाले, शोधाशोध झाली काही समजले नाही.

लोक हे विसरले परत काही दिवसानंतर दुसर्‍या देशातील चार पाच शहरे अशीच गायब झाली. आता मात्र काय करावे कळेना, कुठे शोधणार ती काही छोटीशी वस्तू आहे का? अहो,आख्खी गावेच ना? काही उपयोग नाही. जगाचे व्यवहार थांबत नाहीत. रोजच्याप्रमाणे समुद्रावर कोळी लोक मासे पकडण्यासाठी गेले त्यांनी जाळे टाकले, पण मासेच आले नाहीत, म्हणून त्यांनी समुद्रात पाहिले तर काय आश्चर्य समुद्रात कोणतेही जीव नाहीत, मासे नाहीत, वनस्पती नाहीत काही नाही. ते पळत पळ्त गावात आले. तर गावात गडबड चालली होती, कारण गावातील तळ्यातून, विहीरीतून, नदीतून सर्व पाण्यातून सर्व जीव गायब झाले होते, मेले नाहीत तर गायब. मग अशी बातमी आली कि, सार्‍या जगातून पाण्यातील सजीव,वनस्पतींसहीत गायब झालेत. शास्त्रज्ञ विचार करू लागले, पण काय उपयोग? गायब होउन कोठे जातात काही समजत नव्हते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर कसे लक्ष ठेवणार. बरं भविष्यात काय नष्ट होणार याचा अंदाजच येईना.

असेच काही दिवस गेले, हळूहळू लोकांच्या लक्षात येऊ लागले कि आकशात ढगच येत नाहीत. भारतात पावसाळा येणार म्हणून लोक वाट पाहतात तर काय दूरवर समुद्रावर सुद्धा धग नाहीत जणू ढग तयार होणेच बंद झाले आहे. ढगच नाही तर पाऊस नाही, पीक नाही,जगणार कसे. सर्व जगभरात कृत्रिम ढग कसे निर्माण करणार. आता मात्र जगात खळबळ माजली, लोक घाबरले. चर्चा सुरू झाल्या. होम हवन सुरू झाले. लोक मस्जिद, चर्च, मंदिर, गुरुद्वार, जिथे जमेल तिथे प्रार्थना करू लागले.

आज पौर्णिमा आकाशात पूर्ण चंद्र  असणार, पण कोणाच्या तरी लक्षात आले कि आकाशात चंद्रच आला नाही, उगवलाच नाही, एवढेच काय तर चांदण्या सुद्धा दिसत नाहीत. काय करणार? जे कोणी शास्त्रज्ञ आकाशनिरीक्षण करीत होते त्यांना ग्रह,चांदण्या काही न दिसता फक्त काळे आभाळच दिसत होते. मग त्यांनी मानवाने सोडलेले उपग्रह पाहीले तर ते होते, त्यामुळे जगाचे कामकाज चालू होते, शास्त्रज्ञांना हायसे वाटले.

कोणाला काय करावे काही कळत नव्हते,सुचत नव्हते. जगभरातील सर्व शास्त्रज्ञ एकत्र बसून विचार करू लागले. कल्पनाच करवत नव्हती कि,या अवकाशाच्या पोकळीत फक्त पृथ्वी आणि सूर्यच आहे, बाकी काहिहीनाही.

आता बातमी आली कि,आता तर पूर्ण आफ्रिका खंडच गायब,जणू समुद्रात बुडाले,कि आकाशात उडाले. हळूहळू एकएक खंड गायब होउ लागले. अगदी शास्त्रज्ञ बसले होते ते शहर सोडून बाकी पृथ्वीवरील सर्व गायब झाले आहे. कल्पना येते काय?

आजूबाजूला सर्व वाळवंट आणि समुद्र. हे सुद्धा केव्हा गायब होईल सांगता येत नाही. त्या गावात चार शास्त्रज्ञ आणि तीस लोकच उरले, म्हणजे आता पृथ्वीवर फक्त एवढेच जीव. त्या तीस लोकात विस महिला, सहा पुरूष आणि चार मुले होती.

यांना कल्पनाच नाही कि, आतापर्यंत उरलेला समुद्रही गायब झालेला आहे. वर मोकळे आकाश, आकाशात सूर्य थांबलेला(दिवस रात्र नाही),खाली पृथ्वी आणि या ठिकाणी चौतीस मनुष्यप्राणी(आता भेदभाव कसला).गावात एक मंदिर होते तेथे एक  जण ध्यानस्थ बसला होता.

आता काय करणार, जेवढे गाव होते तेवढे सोडून बाकी सर्व गायब झाले म्हणजे तेवढी जमीन सोढून बाकी सर्व पृथ्वी नाहीच.एखाद्या धूलीकणावर जंतू असतात ना ते वातावरणात तरंगत असतात. फक्त तो धूलीकण(बाकी धूळ नाही) आणि आकाश.

आता सूर्य गायब झाला तर? झाला तर काय,झालाच. छोटासा जमिनीचा तुकडा(पातळसा),तरंगता,त्यावर चौतीस प्राणी, बाही कोणतेही जीव जंतू नाहीत, आणि वर काळे आकाश. काही दिसेना, काही कळेना, कुठे आहोत, दिशा नाहीत.

परमेश्वर कोठे आहे माहीत नाही. उरलेले आकाश गायब झाले पण या जीवांना काय कल्पना, कारण त्यांच्यातीलच एकेकजण गायब होत होते. प्रथम शास्त्रज्ञ, मग सर्व पुरूष (मंदिरातील एक सोडून), स्त्रिया, मुले खालील जमीनीसकट गायब. फक्त आता मंदिर आणि त्यातील एक पुरूष.

झाले संपले ते मंदिर गेले,फक्त तो एक जीवच.

फक्त एक जीव सोडून बाकी काही नाही अगदी आकाश आणि अवकाश सुद्धा. हि कल्पना शब्दात मांडता येईल? काहीच नाही तर काय आहे? देव कोठे आहे? जर काहीच नाही, आकाश, अवकाश नाही, तर ब्रम्हा,विष्णू,महेश,देवलोक, स्वर्ग, नरक, ही नाही तर काय असेल? काय असेल?

कल्पना करून कोणी शब्दात मांडू शकेल काय?

Unknown

No comments: