देशभक्ती म्हणजे काय हो?

देशभक्ती म्हणजे देशाबद्दल असलेला अभिमान, हे तर सर्वांनाच माहित आहे. त्यात विशेष काय? स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अनेकांनी म्हणे प्राण वेचले ती देशभक्ती असेल तर त्यावेळेस आम्ही जन्मलो नव्हतो, तो काय आमचा दोष?  आम्हीहि स्वातंत्र्ययुद्धात भाग घेतला असता.

चांगल्या, हुशार, निरोगी माणसाला जबरदस्तीने जेव्हा त्याला वेडा ठरवण्यासाठी रोज थोडे थोडे औषध देतात, मग तो कालांतराने वेडा होतो, असाच प्रकार शालेय जीवनापसून सुरु असतो, देशभक्त बनवण्याचा. मग काय देशभक्तीच्या व्याख्या सुरु होतात. क्रिकेटची मॅच चालू झाली कि शाळा, ऑफिस, कामधाम सोडून बस मॅचच. खेळाडू जिंकले कि, आनंद नाहीतर त्यांच्या घरावर दगडफेक.(तरी बरे क्रिकेट आपला खेळ नाही). 

देशभक्तीची व्याख्या प्रत्येकजण आपापल्याप्रमाणे करतो. देशभक्तीत देशातील सर्व बांधव येतात ना? मग पाणी तंटा, सीमा वाद, नोकर्‍या या मुद्द्यांवरून लोकांची डोकी का फुटतात?

अफजल गुरुने संसदेवर हल्ला केला, म्हणून त्याला फाशीची शिक्षा झाली, ते प्रकरण राष्ट्रपतींकडे भिजत पडलय, तिथे निर्णय होत नाही. ती कोणत्याप्रकारची देशभक्ती. पंधरा ऑगष्ट, सव्वीस जानेवारीला, झेंड्यासमोर कडक इस्त्रीचा गणवेश घालून, त्यावर मिळालेली पदके अडकवून सलामी द्यायची, नंतर आहेच भ्रष्टाचार. उरलेले दिवस भक्तीपूर्व देशभक्ती.

देशभक्तीचा एक अभूतपूर्व प्रकार म्हणजे, सरकारी सुट्ट्या. थोर पुरूषांच्या नावाने, भरपूर सुट्ट्या घेणारे खरे देशभक्त. रोग्यांची सेवा करण्याची शपथ घेणारे  डॉक्टर  जेव्हा धंदेवाईक होतात तेव्हा देशभक्तीची कल्पना येते. जेव्हा बोफोर्स तोफांचे प्रकरण बाहेर येते तेव्हा आपल्यात देशभक्ती किती आहे हे त्याच तोफा धडाडून सांगतात.

खरे देशभक्त तर सिनेमावालेच, कमीतकमी सिनेमा संपेपर्यंत तरी देशभक्तीत आकंठ बुडवतात. आठवा जरा--उपकार, बॉर्डर, मंगल पांडे वगैरे.पंधरा ऑगष्ट, सव्वीस जानेवारीला गरीब मुले रस्त्यावर झेंडे विकतात, लोक विकत घेतात, मिरवतात पण दुसर्‍या दिवशी रस्त्यावर लोळताना दिसतात, देशभक्ती. याच दिवशी रस्ते अडवून, मोठमोठ्याने स्पीकर लावतात,झाली देशभक्ती. 

देशाची मालमत्ता, संपत्ती सांभाळणे, त्याला नुकसान पोहोचू न देणे, ही देशभक्ती होउच शकत नाही. संप बंदच्या वेळेस जमावाकडून जे नुकसान होते ते काय?

 भारत पाकिस्तानची जेव्हा क्रिकेटची मॅच होते तेव्हा अगदी स्फुरण चढते, पण दुसर्‍या देशाबरोबर खेळताना होत नाही, ही मात्र देशभक्ती. देशभक्तीला कोणत्या तराजूने तोलायचे याला काहीही नियम नाहीत, प्रत्येकजण आपापला तराजू वापरतो.

म्हणून म्हणतो देशभक्ती म्हणजे काय या विषयावर पिएचडी करायला हरकत नाही. पण एक आहे तो पिएचडी करणारा देशभक्तच पाहिजे, नाहितर?

Unknown

No comments: