या पूर्वी आपण मराठी विषय पाहिला आता आपण बाकी पाहू.
इतिहासात स्वातंत्र्य संग्राम, स्वातंत्र्यासाठी कोणी कसे बलिदान दिले ते शिकवतात. बाबर भारतात कधी आला. कार्ल मार्क्स, सॉक्रेटीस, मंडेला, बहामनी, सुल्तान, त्यांच्या सनावळ्या, आई वडिलांची नावे. अरे काय चाललंय, या सर्वांचा पुढील आयुष्यातील व्यवहारावर काय परिणाम होणार आहे. दहावी झाली, बस सगळे विसरले तरी काहीही बिघडत नाही. मुले सर्व पाठ करतात, पण त्यांना स्वतःच्या मागील दोन पिढ्यांचा इतिहास माहीत नसतो. मुलाला पुढे काय करायचे आहे, त्याचा विचार नाहीच, बस शिका, निरूपयोगी शिका. मला सांगा पुढे नोकरी, धंद्यात, संसारात याचा काय फायदा?
भूगोलात काय तर अजून वेगळेच. टुंड्रा प्रदेशातील, आफ्रिकेतील लोकांचे राहणीमान, त्याची वेशभूषा, त्यांची घरे हे शिकायचे. विद्यार्थी कधीतरी तिकडे जाणार आहे काय? आणि जायचे असेल तर या माहितीवर तो तिथे राहू शकतो काय? आता तिथे तीच परिस्थीती असेल काय? अक्षांश रेखांश, द्या बघू बर एखाद्याला अक्षांश रेखांशात पत्ता, आणि त्याला जायला सांगा, काय होते? जगातील सगळ्या देशांच्या राजधान्या पाठ करा, त्याचे नकाशे भरा, नद्या दाखवा, शहरे दाखवा, कशासाठी. जग एवढे पुढे गेलेले आहे हे सर्व इंटरनेट वर मिळत असताना, घोकंपट्टी का? तोच वेळ जरूरीचे शिकवा. मुलगा जगाचा अभ्यास करतो पण त्याला शाळेच्या रस्त्याव्यतिरीक्त रस्ता चुकला तर घरी कसे यायचे ते माहित नसते, ते कोण शिकवणार?
गणितात मुले नापास होतात आणि त्यांचे आयुष्य बरबाद होते. आता दहावीची कित्येक मुले गणितात नापास होतात, म्हणून पुढचे शिक्षण नाही, चांगली नोकरी नाही, म्हणून मनासारखी पत्नी नाही, सगळं आयुष्याचे गणित चुकते. कशापायी तर एका गणित विषयापायी. गणितात काय शिकतो पायथागोरस, बीजगणितातील सूत्रे, भूमितीचे प्रमेय, त्रिकोणमिती, आलेख, रचना, वेगवेगळ्या अकाराचे क्षेत्रफळ, घनफळ, ज्याचा आयुष्यात काहिही उपयोग नाही, त्या गणितासाठी मात्र आयुष्य बरबाद करून घ्यायचे. गणितात १०० पैकी १०० मार्क घेतलेल्याने काय उपयोग करून घ्रेतलाय? फक्त कॉलेज मध्ये प्रवेश घेण्यासाठी. परिक्षेवरून घरी आल्या आल्या तो हे सर्व विसरलेला असतो. हा गणितात पाढे आले पाहिजेत, पण ते तरी कशासाठी, मुले मजेत कॅलक्युलेटर वापरतात. विचार करा, दुकानात हिशोबात वेळ घालवायचा की, कॅलक्युलेटर वापरायचा. जागा विकत घेताना फक्त फुटाचा विचार होतो. अजब शिक्षण आहे.
विज्ञानात शिका प्रयोगशाळेत कार्बन डाय ऑक्साईड, सल्फर, ऑक्सिजन, हायड्रोजन वायु कसा तयार करतात. काय घरी तयार करून श्वासोच्छवास करायचा आहे? की पाहुण्यांना आहेर करायचा आहे? ऑक्सिजची नळकांडी तयार करणार्यालाही याचा काही उपयोग नाही. तुरटी, मोरचूद, चुनखडीचे रासायनिक विश्लेषण शिका आणि दुकानात काय त्र सांगून विकत आणा? मुळात मोरचूदचा काही उपयोग होतो काय? झाडांच्या पानांची रचना, त्याच्या पेशी शिका. काय करणार जाणून? पावसाचे चक्र, कार्बनचे चक्र, नायट्रोजनवे चक्र सांगा या चक्रांचा नोकरी धंद्यासाठी उपयोग?
आता नवीन फॅड निघालय फ्रेंच, स्पॅनिश, जर्मन भाषा विषयाचे, त्याला डोंबलं कधी त्या देशात जायचा प्रसंग येणार नाही पण काय करणार, शिकतोय बिचारा. भले शेजारच्या राज्यातील भाषा नका का येईना. परिक्षेवरून घरी आला कि विसरतो, कारणा त्याचे त्या वाचून काहिही अडत नाही.
उत्तरार्ध अपूर्ण - कसे शिक्षण पाहिजे ते पुढील भागात.
No comments:
Post a Comment