''आषाढी कार्तिकी विसरु नका मज । सांगतसे गूज पांडुरंग ॥''
एक भक्तीरसपूर्ण, परमेश्वर भक्तीच्या अतीव आनंदाचा सोहळा अनुभवायचा असेल तर आळंदी, देहूहून दरवर्षी पंढरपूर कडॆ निघणार्या पालख्यांसोबत चला. पांडुरंगाने नामदेवांना सांगितले, "आषाढी कार्तिकी विसरु नका मज । सांगतसे गूज पांडुरंग ॥'' आळंदीपासून श्री ज्ञानदेवांची तर देहूहून संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरला पायी नेली जाते. यात अनेकजण सामील होतात. ज्येष्ठ वद्य नवमीला माउली आणि तुकारामांच्या पालख्या पंढरपुराकडे मार्गस्थ होतात. या वारीत महाराष्ट्रातील तसेच आजूबाजूच्या राज्यातूनही भाविक येतात. एवढेच नव्हे तर भारताच्या विविध प्रांतांतून भिन्न भिन्न भाषा बोलणारे, विविध चालिरीतीचे श्रीविठ्ठलाच्या भक्तिप्रेमाने आपले भिन्नत्व विसरुन एकत्र येतात, उच्चनीचता, श्रीमंत-गरीब, जातिभेद, भाषाभेद, प्रांतभेद विसरुन आपण सर्व एक श्रीविठ्ठलाचे वारकरी, 'विष्णुदास' आहोत ही भावना मनीमानसी दृढ धरुन येतात. वारकरी संप्रदाय समता, एकता, अभेदता शिकविणारा आहे, कारण त्याला माहीत आहे, ''उच्च नीच काही नेणे भगवंत । तिष्ठे भावभक्ती देखुनिया ॥'' यामुळेच यात्रेत विषमता संपते, भेद-भाव नाहीसा होतो. परदेशी अभ्यासू पर्यटकही हा सोहळा पाहण्यासाठी, अनुभवण्यासाठी सहभागी होतात.
ज्ञानेश्वर माउलींची पालखी आळंदीहून, मंदिरातून ज्येष्ठ वद्य नवमीला निघते, आसमंत 'ग्यानबा (ज्ञानोबा) तुकाराम', 'पुडलिक वरदा हरि विठ्ठल' या नामघोषाने, टाळ-मृदुंगाच्या नादघोषाने दुमदुमत असतो, आणि मार्गक्रमण करीत दशमीला पुणे मुक्कामी येते. वारीत लहान मुले, म्हातारी माणसे, तरूण, सुशिक्षीत, अशिक्षीत सर्व प्रकारचे वारकरी असतात. साधारणत: हा काळ वर्षाॠतूचा काळ. शेतकरी वर्ग शेतात पेरण्या करुन श्रीविठ्ठलदर्शनाची आस मनी घेऊन वारीत येतो. सोबत फुले विकणारे असतात. स्त्रिया डोक्यावर तुळसी वृंदावन घेतात आणि हातात पाण्याची कळशी असती तहानलेल्याला पाणी देण्यासाठी. लोक पालखीच्या मागे पुढे चालतात. त्यांच्या दिंड्या असतात. दिंडी म्हणजे साधारण पंचवीस ते शंभर वारकर्यांचा समुदाय. पंधरा दिवस चालायचे असल्याने त्यांच्यासोबत पुढील रहाण्याची जेवण्याची सोय असते. दिंडीत दिंडीप्रमुख, विणेकरी, टाळकरी असतात. प्रत्येक मुक्कामी त्या त्या गावाचे गावकरी त्यांना जेवणाची मोफत सोय करतात. श्रीज्ञानेश्वर महाराज संस्थान, आळंदी ( जि. पुणे) यांनी श्रीज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदी ते पंढरपूर पालखी सोहळयामध्ये पालखीबरोबर असणा-या दिंडया व त्यांची नावे 1948 साली निश्चित केली आहेत. त्याप्रमाणेच पालखीसमवेत पुढे व मागे दिंडया चालत असतात
पुण्याला संत ज्ञानेश्वराची पालखी पालखी विठोबा मंदिरात तर तुकाराम महाराजांची पालखी निवडुंग्या विठोबा मंदिरात उतरते. पालख्यांचा मुक्काम दोन दिवस असतो एकादशीला पालख्या पंढरपूरकडे मार्गस्थ होतात. पालखी मार्गावर काही दिंड्या पालखीच्या पुढे तर काही पालखीच्या मागे असतात. हा क्रम कधीही चुकत नाही.
सर्व कार्य शिस्तबद्ध चाललेले असते. पोलीसांचा धाक नाही, स्वयंसेवक नाहीत तरीही एवढा मोठा लाखोंचा समुदाय अडीचशे कि.मी. चा प्रवास करून पंढरपूरला पोहोचतो, म्हणजे चेष्टा नव्हे. कोणाचेही नियंत्रण नाही फक्त विठ्ठल भेटीची आस. डोळे पंढरीकडे, तोंडात हरिनाम, कानात हरीगजर, पाय पंढरीच्या वाटेवर. ''दिंडया पताका वैष्णव नाचती । पंढरीचा महिमा वर्णावा किती ॥'' संत नामदेवाच्या या अभंगानुसार लाखो वारकरी 'माझे जीवीची आवडी । पंढरपुरा नेईन गुढी ॥'' हा भाव अंतरी ठेवून खांद्यावर पताका, मुखाने हरिनाम आणि टाळ-मुदुंगाच्या गजरात पंढरीकडे मार्गस्थ असतात.
पालखी मार्गावरील रोजचा कार्यक्रम अगदी ठरलेला असतो. आज वर्षानुवर्षे यात काहीही बदल नाही. सकाळी सहावाजता आरती होते. त्याआधी सर्व वारकरी जमतात. पुढील दिंड्या निघतात. पालखी निघते. मागून मागच्या दिंड्या निघतात, अगदी क्रमाने.दुपारची विश्रांती ठरलेली. जेवण झाल्यावर पुढील मुक्कामासाठी निघणार. मुक्कामी तळावर सर्व समुदाय एकत्र जमतो. पालखीसोबतचा चोपदार हातातील चांदीचा दंड वर करतो, आणि काय आश्चर्य एकदम शांतता. अजिबात आवाज नाही. आपण दहा माणसांना एक मिनीट शांत करू शकत नाही इथे तर लाखो वरकरी पण एक शब्द नाही. तो चोपदार दुसर्या दिवसाचा कार्यक्रम सांगतो, लाउड स्पिकर नाही, पण त्याचा आवाज शेवटपर्यंत जातो. हा प्रसंग अनुभवण्याचा, ऐकण्याचा नाही. नंतर आरती होते आणि पालखी विश्रांतीसाठी जाते. वारकरी विश्रांतीसाठी जातात. जेवण होते. रोज रात्री जागोजागी कीर्तन होते, नामाचा गजर होतो, अभंग म्हणतात आणि विश्रांती घेतात. कारण सकाळी पुन्हा माउलींची सोबत करायची असते.
मार्गात फक्त भजन, ’ग्यानबा तुकाराम’ गजर. रस्त्यावर आजूबाजूला खाण्याच्या वस्तू वाटत असतात पण मार्ग सोडून कोणीही घेत नाहीत, हे तर काहीच नाही, मार्गावर पायाखाली पैसे जरी दिसतील तरी वाकून उचलणार नाहीत, मुळात खाली लक्ष नसतेच. ध्यान फक्त विठ्ठलाकडे. ''आषाढी कार्तिकी विसरु नका मज । सांगतसे गूज पांडुरंग ॥''
उत्तरार्ध उद्या---
No comments:
Post a Comment