भारतीयांचे वेळेचे महत्त्व

आम्हां भारतीयांना वेळेचे महत्त्वच फार. आमच्या दृष्टीने वेळ बहुमूल्य आहे म्हणून आम्ही वेळ वाचविण्याची एकही संधी दवडत नाही.
गरीब, श्रीमंत, सुखवस्तू, सुशिक्षित, उच्च-विद्याविभूषित, अशिक्षीत, पुरुष, स्त्रिया, मुले, राजकारणी, साधु, पूजापाठ सांगणारे, करणारे अगदी सर्व जो भारतीय आहे, त्याच्या रक्तातच वेळ वाचविण्याचे कसब आहे.
कसा वेळ वाचवतात पहा -
१) चौकात लाल दिवा असेल तर, आजूबाजूला पोलीस नाही हे पाहून वाहन सुसाट वेगाने नेतात - वेळ वाचवतात.
२) रहदारीत हिरवा दिवा लाल झाल्यास, न थांबता तसेच वाहन पुढे नेऊन दुसर्‍या बाजूच्या वाहनांची पर्वा न करता वेळ वाचवतात.
३) सायकल स्वार रहदारीची पर्वा न करता, जणू सिग्नल, नियम आपल्यासाठी नाहीतच असा विचार करून न थांबता, सायकल कशीही चालवून थांबतच नाहीत. - वेळ वाचवतात.
४) पादचारी सरळ चालतात, आजूबाजूला बघून थांबत नाहीत, थांबले तर वाहनांनीच यात शाळकरी विद्यार्थीही आले - वेळ वाचवतात
५) वृद्ध काठी टेकत, एक हात वर करून सरळ रस्ता ओलांडतात, त्यानंतर आयुष्याच्या शेवटी शेवटी थांबायला अजिबात वेळ नसतो.
६) सरकारी, कर्मचारी, बँकेतील कर्मचारी वगैरे वेळे आधीच लवकर काम बंद करतात. घरी जातात - वेळ वाचवतात.
७) बसचे कंडक्टर (सार्वजनिक सर्व सेवा) स्टॉपवरील प्रवासी न घेताच डबल बेल देतात आणि वेळ वाचवतात.
८) ड्रायव्हर स्टॉपवर गाडीच थांबवत नाही. पूर्ण वेळ वाचवतो.
९) रस्त्यावरील दुभाजकाला वळसा घालण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा वाहन चालक रॉंग साईड मधून गाडी चालवतो. वेळ वाचवतो.
१०) दुकानदार, रस्त्यावरील, गाडीवरील भाजीविक्रेते, वगैरे विक्रेते. वजनाच्या तागडीत भराभर पटकन माल टाकतात म्हणजे ती तागडी लगेचच खाली जाते - अशा प्रकारे वेळ वाचवतात.
११) पेट्रोल पंपावर स्कूटरमध्ये ऑईल टाकताना, ऑईल मापात बरोबर भरण्यासाठी वेळ लागतो, माप बघावे लागते म्हणून तो पटकन् ऑईल टाकल्यासारखे करतो - आणि लगेचच पेट्रोल भरतो - वेळ वाचतो ना ?
१२) दुकानदार कोणतीही वस्तू एकदाच दाखवतो, दुसरी दाखवायला कंटाळा करतो, मग गिर्‍हाईकाला निवडीला वाव दिला तर वेळ कसा वाचेल ? - मग दुकानदार पुढच्या वस्तू दाखवतच नाही आणि वेळ वाचवतो.
१३) गणपतीचे वर्गणीवाले, वर्गणी मागायला आले की लगेचच वर्गणी द्यावी लागते. नाहीतर त्यांना पुन्हा येण्यासाठी वेळ नसतो ना ?
१४) सोसायटीत खाली पायर्‍या उतरताना लिफ्ट वापरू नये, पण चालत कोण जाणार ? वेळ कोठे आहे ?
१५) रस्त्यात अपघात झाल्यावर दोन्ही वाहनचालक लगेचच एकमेकांशी हमरीतुमरीवर येतात ? समजून घ्यायला वेळ कोणाकडे आहे ?
१६) पोलीस चौकीत तक्रार घेऊन गेल्यास सामान्य माणसाचे ऐकूनसुद्धा घेत नाहीत - एवढा वेळ पोलिसांकडे अजिबात नसतो.
१७) कोर्टात अशीलाला एका ठिकाणी बसवुन दिवसभर वकील सर्व कोर्टात फिरत असतो संध्याकाळी अशिलाला तारीख घ्यायला लावून निघून जातो. एवढ्या केसेस त्याच्याकडे असतील तर तो अशा केस चालवायला वेळ कुठून काढणार ? म्हणून केसेस न चालवताच पैसे घेऊन वेळ वाचवतो.
किती! किती! आपण भारतीय वेळ वाचवतो आणि आपल्याला वेळच नसतो!

Unknown

No comments: