कासवाची माया

काल एका मंदिरात जाण्याचा प्रसंग आला. मंदिर फारच प्रसन्न होते. भारतात हिंदूंच्या मंदिरात त्या देवतेच्या समोरील बाजूस त्या देवतेच्या परम भक्ताची अथवा वाहनाची मूर्ती असते. उदा. रामा समोर हनुमान, विष्णुसमोर गरूड, देवी समोर सिंह, महादेवासमोर नंदी वगैरे.

अषीच चर्चा चालली असता, असे जाणवले की या व्यतिरिक्त देवळाच्या गाभार्‍यात पितळेचे अथवा संगमरवरी दगडाचे कासव असते. प्रश्न पडला की कासवाचे प्रयोजन काय? ते काही कुठल्या देवाचे वाहन नाही. शिवाय सर्व प्रकारच्या देवळांतून कासव असतेच.

कोणी म्हणाले, अमृतमंथनासाठी कासवाने टेकूचे काम केले म्हणून त्याला इथे स्थान दिले गेले. कोणी म्हणाले, तो अत्यंत गरीब प्राणी आहे म्हणून. अजिबात काही पटेना. मग काही अर्थ लावता येईना. कारण जे कारण देले जाईल ते पटले पाहिजे ना! मग एकाच्या डोक्यात आले, तिथे एक आजोबा बसले होते त्यांना विचारू यात. त्यांनी सांगितले -

सर्व प्राणी आपल्या पिल्लांची काळजी घेतात, ती लहान असतात तेव्हा त्यांना हालचाल करता येत नाही. शिवाय त्यांना प्रेमाने वाढवावे लागते. संकटकाळी पिल्लांना सुरक्षित स्थळी हलवावे लागते. त्यांना माया द्यावी लागते. माणूस काय करतो, बाळाला जवळा घेतो. कोंबडी पिलांना पंखाखाली घेते. बाळ बिलगून बसते आणि प्रेमाने वाढते. कासवाच्या बाबतीत मात्र तसे काहीही घडत नाही, कासव पिल्लांना कशी माया देते माहित आहे, ते पिल्लांकडे फक्त पाहते, आणि पिल्लांची मायेने वाढ होते. कासवाला पिल्लांना जवळ घ्यावे लागत नाही.  म्हणून जे कासव देवळाच्या गाभार्‍यात असते. त्याला तुम्ही हात नाही लावला तरी, ते तुमच्याकडे पाहिल्यावर, देवाची माया तुम्हाला मिळते. बघा त्याच्या नजरेत एवढी शक्ती आहे.

खरोखर देवाची कमाल आहे, काय त्याने जग बनवलंय. मांजर पिलांच गळा दातात पकडून उचलते, पण पिलांना दात लागत नाही. मगर तोंडात पिले भरते, आणि हलवते, पण पिले गुदमरत नाहीत. अजब आहे.

Unknown

No comments: