कोजागिरी

आयुर्वेदात कोजागिरीला विशेष महत्व आहे, कारण कोजागिरीच्या चंद्राचा आकार नेहमीच्या पौर्णिमेच्या चंद्राच्या आकारापेक्षा मोठा असतो. या दिवशी चंद्र विशेष आवुर्वेदिक शक्तीचा वर्षाव करीत असतो. यादिवशी दुधाची खीर अथवा मसाल्याचे दूध साधारण रात्री आठ ते बारा वाजेपर्यंत चांदण्यात उघडे ठेऊन पितात. असं म्हणतात , हे दूध दम्याला गुणकारी असते.

तसं पाहिलं तर चंद्राचं नातं आपल्याला फार जवळचे आहे. भाऊबीजेला ज्या स्त्रीयांना, मुलींना भाऊ नसतो, त्या चंद्राला भाऊ म्हणून ओवाळतात. म्हणून लहान मुले चंद्राला "वांदोमामा" म्हणतात, आणि या मामावर अनेक बालगीते आहेत. तरूण, तरूणी तर या चंद्राला साक्षी ठेऊन प्रीतीच्या आणाभाका घेतात. चित्रपटात पूर्वी चंद्राच्या उपस्थितीतच प्रेम गाणी पूर्ण होत. तसं पाहिलं तर प्रत्येक पौर्णिमेला विशेष महत्व आहे.

वैत्र - हनुमान जयंती, वैशाख - बौद्ध पौर्णिमा, ज्येष्ठ - वट पौर्णिमा, आषाढ - गुरू पौर्णिमा, श्रावण - राखी पौर्णिमा, भाद्रपद - प्रोष्ठपदी पौर्णिमा, आश्विन - कोजागिरी पौर्णिमा, कार्तिक - त्रिपुरी पौर्णिमा, मार्गशीर्ष - दत्त जयंती, पौष - शाकंभरी पौर्णिमा, माघ - माघी पौर्णिमा, फाल्गुन - होळी.

केव्हाही अनुभव घ्या, चंद्राच्या चांदण्यात शीतल, प्रसन्न, आल्हाददायक  वाटते. त्याच्या प्रकाशात फुले उमलतात, नव्हे तो हळूवारपणे त्यांना उमलण्यास मदत करतो. चंद्राला पाहून तर पृथ्वीवरील सागरालाही भरती येते तर मनुष्यप्राणी किंवा वनस्पतींची काय कथा.

कोजागिरीचा कुलधर्म फार महत्वाचा असतो. या दिवशी कोजागिरी व्रत करतात. आल्हाददायक वातावरणात  आकाशातून लक्ष्मी या रात्री पृथ्वीवर येते आणि कोण जागलेले आहे हे पाहून त्याला सुख समृद्धी बहाल करते. म्हणून या रात्री जागे राहून घर उघडे ठेवतात. या रात्री लक्ष्मीची प्रतिक्षा करताना जागे राहून मनोरंजनाचे कार्यक्रम करतात, व्रतस्थ राहतात. रोजच्या धकाधकीच्या, चिंतेच्या वातावरणात कोजागिरी एक नवचैतन्य निर्माण करते.

कोजागिरीच्या चांदण्याचा  दुधाळ प्रकाश, त्याची शीतलता मनाची प्रसन्नता वाढविते, आणि आपणा निसर्गाच्या अधिकाधिक जवळ जातो.

Unknown

No comments: