महागाई वाढली, आकाशा भिडली
दात अन् अन्नातील दरी वासली
माझ्यातील वाघाची मेंढी झाली
आणि, सरकारी देवासमोर कापली
मुलं झाली, निसर्गानं वाढवली
डोनेशननं शिक्षणा गाडी अडली
खाल मानेनं लाचारीत नोकरी केली
मालकानं उठताबसता लाथ घातली
निसर्ग कोपला, आजारानं हाय खाल्ली
डाक्टरनं नखानं कातडी सोलली
माझ्यातील माणसाची मेंढी झाली
अन् सरकारी इस्पितळात कापली
पोरगी घोर लाऊन वयात आली
काय करू, कसायाच्या गळ्यात बांधली
जावया मुखी लाख लाखोली
लेकीची रोजच लावतो बोली
सासर्याची जावयाने केली मेंढी
रगात नाय, पण पुरती कापली
नदी नाले विहीर आटली
पण डोळीस धार लागली
आकाशी नजर भिरू लागली
कुठलं ढग, नुसतीच काहिली
दुष्काळानं, किती बांगडी फुटली
लहानग्यांची सावली तुटली
शेतकर्याची बघ मेंढी झाली
मेंढीनं जरासी आत्महत्या केली
राजानं मदत जाहीर केली
उपाशी पोटी रांग लावली
शंभराची नोट दिसाया लागली
पदरी दहाची पवित्र झाली
मधली गळती, कुरतडली
काय करणार? नसती मिळाली
पोटाच्या आगीने मेंढी केली
दहाची खाल्ली,शंभराची ढेकर दिली
शेवटी देवाची आणा भाकली
त्याला फुरसत नाय गावली
वैतागून मोप भगती केली
रडतखडत देवाची पावलं आली
म्हणाला माणसांनी, माझीच मेंढी केली
राजकारण्यांनी निर्दयतेने कापली.
माणसातील वाघावी मेंढी झाली
उरली सुरली आशा संपली
मानेच्या कण्याची ताकद नुरली
स्वतःहून कापाया तयार झाली
कापून कापून, कापाया काय उरली?
No comments:
Post a Comment