ये

मी माझ्या मनातील कप्पा रिता करीत होतो,

कारण तू येण्याचे वचन दिले होतेस,

वसंत्तात येण्याचे,

हळूवर मंद चाफ्याच्या सुगंधतून,

अल्लड बागडणार्‍या फुलपाखरातून,

गजगामिनीच्या चालीने,

नागीण वेणी डौलाने झुलवत,

मोगर्‍याचा गजरा माळून,

वसंतातील उन्हातून आल्यावर,

लालीलाल गालामधून,

सुंदर राजहंसी दंतपंक्तीतून,

आणि काय सांगू,

माझ्या हृदयाच्या मखमली पायघडीवरून,

तू येणार म्हणून माझे वाट पाहणे,

चातकाला लाजवीत होते,

माझी आर्त हाक जाणवून,

मदन मदनबाण मारायचा विसरला,

आतातरी तू ये,

तुझ्या येण्याच्या चाहुलीने,

हृदय थांबू दे,

म्हणजे ते वाट पाहणे नको,

कप्पे रिते नकोत,

मदनाला आपले काम करू दे,

आणि असे प्रेमवीर घायाळ होऊ देत.

सर्व वेलींवर फुले फुलू देत,

न फुलण्याचे पाप मला नको.

Unknown

No comments: