मी खासदार बोलतोय!

निवडणुका पार पडल्या आणि बाबा मी एकदाचा निवडून आलो, काय काय भानगडी कराव्या लागल्या त्या माझ्या मनालाच माहीत. तेव्हा आभार प्रदर्शन करायला बोलावले आहे तेव्हा चार शब्द सांगावे म्हणतो -

मला मायबापांनो तुम्ही निवडून दिलेत त्याबद्दल आभार, नाहीतरी मी निवडून येणारच होतो, कारण आपण तशी फिल्डींगच लावली होती ना. सर्व निवडणूक केंद्रांवर आपली माणसेच पेरली होती, काय खर्च आला म्हणून सांगू. आपण आधी कायपण खर्च केला नाही, पण बुथवर मात्र मोकळा हात सोडला होता.

या भागातील विकास कामे पूर्ण करण्यासाठी मी सर्व कंत्राटे जवळच्या माणसांना (नातेवाईकांना) देईन म्हणजे काम बरोबर न झाल्यावर बोलता येते हो, आणि शिवाय त्यांनी एवढी मेहनत घेतली आपल्याला निवडून आणायला, ती उगाच काय?

मी प्रत्येकाला रोजगार मिळवून देईन, पण शिक्षण पाहिजे बरं का, नाहीतर एम्प्लॉयमेंट एक्चेंज मध्ये नाव नोंदवायला मदत करेन.

नळाला पाणी येण्यासाठी प्रयत्न करेन, पण जर पाणी नाहीच आले तर टॅंकरची सोय करेन, आणि प्रत्येकाला खास निधीतून फिल्टर देईन. शेवटी आम्हालाही तुमच्या आरोग्याची काळजी आहेच ना!

मुलांना मोफत शिक्षणाची सोय करेन. त्यांना दुपारी खिचडीचा कार्यक्रम असेल, त्यासाठी माझ्या शेतातील तांदूळ वापरेन, त्यासाठी निधी वापरला जाईल. इंग्रजी माध्यमाच्या शाळा उघडल्या जातील, गावाचे मुलं कशी फाडफाड इंग्रजी बोलली पाहिजेत.

शेतकर्‍यांना भरभरून कर्जे दिली जातील, कर्ज माफी नाही, कारण ती कर्जे मिळतील ती पुढच्या निवडणुकीपर्यंत फेडायचीच नाहीत, म्हणजे पुढील वेळेस ती तुम्हाला पूर्ण माफ केली जातील, याची मी हमी देतो.

आपल्या भागात साधा विमानतळ नाही म्हणजे, हा अपमानच आहे. यासाठी मी कसून प्रयत्न करेन.जगाशी सांपर्क नको काय?

प्रत्येक घरात एक एक T.V.तो पण रंगीत देणार आणि नाहीतर आपले भाषण कसे लोक पाहणार.

उन्हाळ्यात प्रत्येकाला A.C.ची सोय करणार, हप्ताने बॅंकेकडून घेऊन देणार, नव्वद टक्के सबसिडीवर.

गावात कोणत्या देवाचे देऊळ नाही ते बघा, आपण बांधू म्हणजे उरसाची सोय झाली, तमाशा आयताच आला की नाही!

आपण जाहीरनाअमा छापलाच नाही, उगाच कोणीतरी पुढील निवडणुकी पर्यंत जपून ठेवला म्हणजे आली का पंचाईत.

हे जे आपण करणार आहे ते सर्व खासदार निधीतून, तेव्हा कोणाच्याही बापाचे काही जाणार नाही, तेव्हा कोणीही माज करायचा नाही. जे जसं मिळेल तसं गोड मानून घ्यायाचं काय!

ही सगळी तयारी मी पुढची निवडणुक डोळ्यासमोर ठेऊन करीत आहे, एवढं ध्यानात ठिवा.   

( वरील सर्व कल्पनाविलास आहे, व्यक्तिगत कोणीही घेऊ नये )

Unknown

No comments: