समाधान

मी एका कंपनीत चांगल्या पदावर काम करीत आहे; पण वरिष्ठांनी एखादी चूक दाखवली, की खूप अस्वस्थपण येतो. मुख्य म्हणजे मी खूप काम करुनही मला कामाचे समाधान मिळत नाही. सारखी मनाची घालमेल सुरु असते. त्यातून नुकताच बीपीचा त्रास सुरु झालेला आहे. योग्य मार्ग सुचवावा.

आपण एकंदरीत हुशार आणि कार्यतत्पर अधिकारी आहात. आपले स्वतः बद्दलचे मत आणि इतरांचे आपल्याबद्दलचे मत यांच्या एकत्रीकरणातून आपली स्वतः ची विशिष्ट प्रतिमा आपण तयार करीत असतो. एकदा का ही स्वप्रतिमा तयार झाली, की आपण त्यानुसार वागण्याचा प्रयत्न करीत राहतो; मात्र सभोवतालची परिस्थिती व आपली जुळवून घेण्याची क्षमता यातील अंतर वाढत जाते, तेव्हा आपण ' मानसिक ताणाचा ' अनुभव घेतो. सातत्याने तणावाचे दडपण जाणवत राहिल्यामुळे आपणाला इच्छा असूनही आराम करता येत नाही, त्यामुळे शारीरिक थकव्याबरोबरच बौद्धिक थकवा जाणवतो, निराशा वाढते आणि मुख्य म्हणजे वस्तुनिष्ठपणे विचार करता येत नाहीत. सततच्या ताणतणावामुळे झोप लागत नाही. पचनसंस्था, स्नायू यावर अतिरिक्त दाब पडतो आणि डोकेदुखी, रक्तदाब, हदयविकार इत्यादींसारख्या शारीरिक आजारांना सामोरे जाव लागते. आपल्या ताणाचा वाढता भार सहन करावा लागण्यापाठीमागे महत्त्वाचे कारण म्हणजे आपण करीत असलेले अवास्तविक विचार होय.
बर्‍याच वेळा आपली स्वतः ची अशी अपेक्षा असते, की आपण कधीही चुकता कामा नये. चूक होणे ही भयानक गोष्ट आहे. आपण स्वतः कडून अशी बिनचुकपणाची अपेक्षा बाळगत असल्यामुळे छोटया चुकीबद्दलही विलक्षण अपराधी वाटते. कदाचित त्यामुळे आपला ताण त्यामुळे कायम राहत असेल; मात्र एक लक्षात घ्यायला हवे , ही चुका न होन्याची खरदारी आपण घेऊ शकतो; परंतु चूक झाली तर मनात अपराधगंड निर्माण होऊ द्यायचा नाही. या प्रकारचा वास्तविक, स्पष्ट आणि तर्काला पटणारा विचार मनात बाळगला, तर मानसिक ताणाचा त्रास होणार नाही. कामाच्या ठिकाणी पाठिंबा आणि प्रोत्साहन मिळायला हवे हे खरे आहे; पण आपल्याला हवा तसा, हवा तेव्हा आणि हवा तेवढा पाठिंबा कोणी देऊ शकत नाही, हे वास्तव सत्य आहे. त्यामुळे आपणच आपल्याला प्रोत्साहित ठेवायचे, आपला आत्मविश्वास आपण वाढवायचा आणि आपल्या कामातील आनंद आपणच शोधायचा अशी वृत्ती आपण जोपासली, तर आपल्यावरील मानसिक ताण आपोआप कमी होत जातो. आपण सदैव तणावाखाली काम करत असू, तर अस्वस्थपणा व असमाधन टिकून राहते; पण जास्तीत वास्तविक व तर्कशुद्ध विचारांचा आधार घेत आत्मसमर्थनाची सवय मोडून काढायचा प्रयत्न करीत राहिलो, तर सहजपणे व आनंदाने आपण आपले काम पार पाडू शकू. साहजिकच अस्वस्थपणा कमी होऊन आपला B.P चा त्रासही कमी होईल, त्यासाठी -
* वस्तुनिष्ठ विचार करण्याची सवय लावा.
* विनोदबुद्धी शाबूत ठेवा.
* शारीरिक व मानसिक आरोग्याची काळजी घ्या.
* ताणरहित स्थितीत राहण्याचे प्रशिक्षण घ्या.
मुख्य म्हणजे ' ताणातही जग जगते, आनंदे हसते ' ही वास्तवता लक्षात ठेवली, तर आपल्यासारखे आनंदी आपणच !!

Unknown

No comments: