मित्र आणि कर्म

पाणी आणि दूध यांचे नाते काय सांगते. हंसाला दूध आणी पाणी वेगळे करण्याची कला अवगत आहे असे म्हणतात. पण वेगळे कशाला करायला पाहिजे.

दुधात पाणी मिसळले तर काय चमत्कार होतो पहा.

भेटीस आलेल्या पाण्याला, जणू मित्रच आलाय भेटायला असे समजून दुधाने स्वतःचे सर्व गुण पाण्याला देऊन टाकले. आणि पाण्याचे अस्तित्व दुधात मिसळून गेले. आणि हे पाणी दुधाच्याच भावाने विकू लागले. पुढे हे पाणी मिश्रीत दूध चुलीवर ठेवल्यावर, पाणी विचार करून, आपल्यासाठी दुधाला ताप लागतो हे पाहून, आपण आपले निघून जावे म्हणून आणि दुधाचा ताप वाचावा म्हणून स्वतःचे अग्नीत बलीदान केले म्हणजेच वाफ होऊन उडून गेले. आता ते दूध, आपल्यामुळे अग्नीने आपल्या मैत्राला जाळले, तेव्हा आपणही सहगमन करावे या विचाराने भराभर उसळी घेऊन, उकळून, उसळ्या मारून अग्नीत बलीदान करण्यास निघाले.

दुधाचे पातेल्याबाहेर उसळी घेणे न समजून गृहिणी, दूध उतू जाणे शांत होण्यासाठी, पाण्याचा हबकारा मारते, तेव्हा दुधाला आपला मित्र पुन्हा भेटल्याचा आनंद होतो आणि ते मित्रप्राप्तीच्या आनंदात कसे शांत होते.

सज्जनांची मैत्री अशी असते.

चांगले मित्र योग्य वेळी भेटणे हा सुद्धा नशिबाचाच भाग असतो. वाईट संगत माणसाला रसातळाला नेते. हे सर्व कर्म आहे. त्या कर्माला नमस्कार असो.

ज्याने ब्रम्हांडगोलामध्ये, ब्रम्हदेवाला एखाद्या कुंभारासारखे कामाल जुंपले आहे.  ( जसे कुंभार मडकी घडवतो, त्याचप्रमाणे ब्रम्हदेव मुंडकी घडवून सृष्टीची निर्मिती सतत, अविरत करत आहे. ) ज्याने महासंकटपूर्ण अशा दहा अवतारांच्या जंजाळात विष्णूला कधी फेकले हे त्या विद्वान विष्णूलाही कळले नाही, ज्याने शंकराला हाती कवटी देऊन भिक मागावयास लावले, स्मशानात बसवून उलट त्याला त्याचाच अभिमान बाळगावयास लावले, आणि सूर्याला सतत तळपत ठेऊन, आकाशात उसंत न घेता जळत ठेवले, त्या कर्माला नमन करू यात. ही कदाचित् त्यांच्या पूर्वकर्माची फळे तर नसावीते, आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे दुःख सांगण्यासाठी, वाटून घॆण्यासाठी त्यांना मित्र नसावेत. अगाध आहे. 

Unknown

No comments: