म्हातारपण

सामाजिकदृष्ट्या अजूनही वृद्धांच्या समस्येकडे लक्ष दिले जात नाही. कारण त्या समस्या सामाजिक आहेत हे लक्षातच येत नाही. मुळात घरगुतीसुद्धा लक्षात येत नाहीत. वृद्ध जर आर्थिकदृष्ट्या सबळ असतील तर त्यांच्या अनेक समस्यांवर आपोआपच उत्तरे मिळतील असे वाटते. त्यांच्याकडे भरपूर वेळ असतो, अनेक समाजोपयोगी कामात त्यांच्या अनुभवाचा फायदा घेता येईल. पण त्यांना घरच्या माणसांकडून प्रथम आधार मिळाला पाहिजे.

तरूणपणी काही लोक मुळाबाळांना घडविण्याचे व्रत घेऊन आपल्या म्हातारपणाचा विचार करत नाहीत, सर्व मुलांच्या भवितव्यासाठी अर्पण करतात. पण काही जण थोडे राखून मुलांना मोठे करतात, आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभे करतात आणि म्हणतात बाबा आता तुझे नशीब. तर काहीजण स्वतःच्या चैनीकडेच लक्ष देतात मग मुले कशीपण वाढतात.

आपल्या देशात ज्येष्ठ नागरीकांसाठी अनेक योजना जाहीर करण्यात येतात. पण त्या उथळ आहेत त्याला अर्थ नाही. कायदा करून समस्या सुटत नाहीत. सामाजिक, भावनिक बंधन असावे लागते. आपल्या वृद्ध आईवडिलांचा संभाळ करावा, त्यासाठी कायदे केलेत, पण अशा उपचारांचा फायदा आहे काय? यासाठी कोर्टात जायचे म्हटले तरी पैसा पाहिजे शिवाय अंगात त्राण पाहिजे, या वयात शक्य आहे काय? वृद्धांच्या अनुभवाचा अपमान झाला नाही पाहिजे याचा विचार त्यांचे पोटचे गोळे करत नाहीत, तर इतरांचे काय?  ज्येष्ठांचा आदर करा ही आपली शिकवण आहे, पण तसे घडते?

सद्याचे जीवन धावपळीचे आहे मान्य आहे, पण म्हणून आपल्या वृद्ध मातापित्यांना संभाळायला नको काय? आजकालच्या जमान्यात वॄद्ध नोकरी करू शकत नाहीत.

शेवटी काय तर परावलंबी जीवन वाईट, आपल्याला कोणीतरी काहीतरी देईल मग आपण घास घेऊ ही भावना मरणप्राय वेदना देते, पण वाढलेल्या वयाने सर्व दारे बंद केलेली असतात.

ज्येष्ठ नागरिक दिनाच्या निमित्तने.

Unknown

No comments: