देवालय न्यायालयात

एका वृत्तपत्रतील बातमी -

देशात कुठेही यापुढे सार्वजनिक ठिकाणी कोणतेही प्रार्थनास्थळ उभारण्यात येऊ नये, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी केंद्रसरकारला दिले. मंदिरे, मशिदी, गुरूद्वारा, चर्च तसेच इतर सर्वे समुदायाच्या प्रार्थनास्थळांसाठी हे निर्बंध लागू राहतील, असे न्या. दलवीर भंडारी आणि न्या. मुकुंदकम्‌ यांच्या खंडपीठाने आपल्या अंतरीम आदेशात म्हटले आहे. शिवाय हा आदेश भारतभर अंमलात आणावा. याला कारण असे झाले की, मे २००६ मध्ये गुजरात सरकारने अतिक्रमण करून बांधलेल्या  जागेतील सर्व प्रार्थनास्थळे तोडण्याचा आदेश दिला होता, यावर सादर झालेल्या याचिकेवर हा अंतरीम निर्णय देण्यात आला.

म्हणजे प्रार्थनास्थळांचे एवढे प्रस्थ माजले आहे की, यावर आदेश द्यावा लागत आहे. पण आम्ही भारतीय कधी विचार करतो का? कामापेक्षा आपल्याला देवधर्म जास्त महत्वाचे वाटतात. एकच उदाहरण देता येईल ते म्हणजे महाराष्ट्रातील गणेशोत्सव. काय त्याला विकृत रूप आले आहे. गणपती उत्सव झाल्यानंतर ती मुर्ती जवळच एखादे मंदिर बांधून त्यात वर्षभर ठेऊन पूजा केली जाते. पण यापासून रहदारीला काय अडथळा होतो आहे याचा विचारच नाही.

कोणीही उठसुठ उठतो (म्हणजे एकादा राजकारणीच म्हणा ना) आणि गल्लीतल्या मुलांना घेतो आणि देतो एक मंदिर बांधून. किती देव किती मंदिरे. गणना नाही. बरे त्यांची नावे सुद्धा अगदी मजेशीर. पुण्यातच पहा देवतांची नावे - पंचमुखी मारुती, भांग्या मारुती, जिलब्या मारुती, डुल्या मारूती, अवचित मारुती, भिकारदास मारुती, अकरा मारूती, वीर मारुती, दास मारुती, चिमण्या गणपती, पेशवे गणपती, उपाशी विठोबा वगैरे. इतकी देवळे आहेत ना? बस‌.

भक्त तरी किती चालू, गाडीवरून जात असताना फक्त मान झुकवणार, बस त्या देवाने ओ.के. म्हणायचे. देवाला पाया पडताना चप्पल हरवू नये म्हणून त्याच चपलेवर उभे राहून पाया पडायच्या. पाया पडताना मागे पहायचे नाही. कितीका रहदारीला त्रास होऊ देत. आम्हां हिंदूंना एवढे देव कोणी दिले असतील, ते एक देवच जाणो.

गंमत आहे, एका रस्यावर गणपतीचे मंदीर, पुढच्या चौकात हनुमानाचे मंदीर, मग पुढे दत्ताचे, त्या पुढे एखादी देवी वगैरे. आमचा भक्त काय करतो, गुरूवारी दत्ताला जाताना त्याला रस्यातील मारूती दिसत नाही, तर मंगळवारी त्याची देवीशिवाय कोणाचीही ओळख नसते.  अगदी ढुंकुनही पहात नाही. अशी भक्ती.

सकाळी दोन दोन तास  पूजा केल्याशिवाय मन भरत नाही.

जेवणात मीठ किती पाहिजे, फक्त चवीपुरते, पण ते पूर्ण ताटाच्या मानाने किती असते? चिमुटभर, पण त्याने जेवणाचे समाधान मिळते ना? मीठ जास्त किंवा कमीचा विचार करा. काय होई?. तसेच देवाचे स्थान सुद्धा आपल्या आयुष्यात मिठासारखेच असू द्यावे.

Unknown

No comments: