दारू एके दारू

महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांनी धान्यापासून दारू गाळण्याचा निर्णय घेतला आणि चारी बाजूंनी रान उठल्यावर तो निर्णय मागे घेतला. पण असे निर्णय घेऊन लोकांची मने सतत ढवळत का ठेवायची हे काही समजत नाही. आता एक नवीनच फॅड सरकारच्या सुपीक डोक्यातून बाहेर आले आहे, करवंदापासून दारू निर्मिती करणे. आहे मग त्याला भरपूर अनुदान. मुळात एवढे गंभीर विषय सरकारपुढे असताना, हे राजकारणी दारू गाळण्याच्या का मागे लागले आहेत समजत नाही. सरकारला काय वाटते राज्यातील समस्त जनतेने तळीराम होऊन दिवस रात्र तर्र होऊन जावे काय?

राज्यात दिवसढवळ्या बलात्कार होताहेत, दरोडे पडत आहेत, तडीपार गुंड मोकाट सुटले आहेत, अजूनही जर्मन बेकरीच्या बॉम्ब स्फोटाच्या तपासात प्रगती नाही, आदिवासींचे प्रश्न भेडसावत आहेत, महावितरणने तर सरळसरळ दरोडेखोरी सुरू केलेली आहे, नक्षलवादी डोके वर काढताहेत, दुधाचे भाव रोज वाढताहेत, एक ना अनेक प्रश्न सरकारपुढे असताना सरकारला हे सर्व कसे काय सुचते एक परमेश्वरच जाणो. मला वाटते तोही बिचारा यांचे राजकारण बघून कंटाळला असेल. एकेकाळी औद्योगिक विकासात महाराष्ट्र देशात आघाडीवर असताना आता त्याची काय परिस्थिती आहे, हे सरकारने जाहीर करावे. दारू पिऊन विकास करता येत नाही. गावोगावी महिला बाटली आडवी करण्यासाठी जीवाचे रान करताहेत आणि त्याच राज्यात सरकार मात्र बाटलीचा पाया मजबूत करत आहे. या गुन्ह्याला माफी नाही. एकीकडे दारूबंदीची भाषा करायची आणि दुसरीकडे दारू गाळण्याचे परवाने द्यायचे.

हे सरकार काही दिवसांनंतर शालेय अभ्यासक्रमात दारू गाळण्याचा प्रोजेक्ट ठेवेल आणि त्यावर धडा सुद्धा असेल. अगदी महात्मा गांधींच्या फोटोच्या साक्षीने. सरकारने आता पुरस्कार जाहीर करावेत - दारूश्री, दारूभूषण, दारूविभूषण, दारूरत्न, दारूसम्राट, दारूकेसरी.

काय होणार आहे या महाराष्ट्राचे आणि येथील जनतेचे.

लोकमान्य टिळक गर्जले होते. या सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?

Unknown

1 comment:

Vijay Deshmukh said...

लोकमान्य टिळक गर्जले होते. या सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?

हे आजकाल रोजच म्हणावे लागत आहे :(