सवाई माधवराव लग्न - भोजनसमारंभ

कोठेहि लग्नसमारंभांत भोजनाची व्यवस्था टीपदार असली म्हणजे त्यास ‘नाना फडणिशी बेत’ असें स्तुतिपर शब्दानी संबोधण्यात येते. सवाई माधवरावाच्या लग्नाचा कार्यक्रम खुद्द नानांचा नजरेखालीच झाला असल्यामुळे त्याची योजना किती नमुनेदार असेल हें सांगावयास नकोच. त्यासंबंधाच्या याद्या काव्येतिहाससंग्रहात छापल्या आहेत त्या वाचल्या असता पाटरांगोळ्यापासून नाचरंगापर्यंत सर्व बंदोबस्त कसा शिस्तींत होता याविषयीं खात्री पटते. पेशवाईतील भोजनाच्या बेताची आजहि ख्याति आहे, ती अगदीं यथार्थ होती हे खालील माहितीवरुन सहज लक्षांत येईल.

“खासे पंगतीस केळीची पाने चांगली थोर मांडावी. फाटकी व डागीळ नयेत. द्रोण दर पानास दहा बारापर्यंत मांडावे. ते चांगले दोहो काडयांचे केळीचे नोकदार असावे. चांगल्या ठशाच्या रुंदाळ रांगोळ्याची रांगोळी घालावी. ती हिरवी, पांढरी, गुलाली वगैरे, तर्‍हतर्‍हेची असावी. पाट एके सुताने सारखे मांडावें. त्यांत खासे पंगतीस रुप्याच्या फुल्यांचे वगैरे चांगले थोर एकसारखे पाहून बसावयास व जागा असेल तसे टेकावयास मांडावे. खासे पंगतीस उदबत्तीची घरे व झाडे रुप्याची असतील ती लावावी. वरकड जागा सोंगटी मांडावी. केशरी गंध अर्काचें व मध्यम असें दोन प्रकारचें करावें. केशरी गंधात केशराची कसर राहू नये. अक्षता उंची कस्तुरीची व मध्यम कस्तुरीची अशा दोन कराव्या. गंध लावणारे चांगले कुशल चौकस माणूस असावे. त्याणी साखळीनें कपाळी लावावें. वाकडे गंध लावू नये. अक्षत लावतेसमयीं नाकास धक्का न लागता कपाळाचा मध्य पाहून लहान. मोठी अक्षत ओघळ न येता वाटोळी लावावी. गंध उभे आडवे ज्यास जसे पाहिजे तसे लावावे. गंध अक्षता लावणार यानी नखे काढून बोटे चांगली करुन लावावे.’

“अंगास लावावयास केशर व अर्गजा वगैरे सुवासिक एक व साधे पांढरे एक व गुलाबी चंदनाचे व कृष्णागराचे याप्रमाणे चांगली उगाळावी. हातास लावण्याचें गंघ देतेसमयी भागीरथीचा गुलाब (पाणी?) वाटीत पुढें ठेवीत जावा.

“भोजनास भात साधा दोन प्रकारचा. खासा व मध्यम. साकरभात व वांग्याचा भात वगैरे सरासरी दोन करीत जावे. वरण तुरीचे. सांबारी दोन प्रकारची. आमटी दोन प्रकारची. लोणचे दहा प्रकारचे चिरुन व साखरेचे लोणचे. कढी सारे दोन प्रकारची. भाजा दहा बारा प्रकारच्या कराव्या. त्यांत एक दोन प्रकार तोंडली पडवळे वगैरे. मागाहून उष्ण व सगळी वांगी वगैरे उष्ण वाढावी. क्षीर वळवटे दोन प्रकारची. दररोज खिरी दोन प्रकारच्या निरनिराळ्या. पूर्ण पोळ्या सपाटीच्या. पक्कान्नें घीवर फेण्या वगैरे तीन चार प्रकार दररोज. वडे साधे व वाटल्या डाळीचे कढिवडे. तूप साजूक फार चांगले व मध्यम. मठ्ठा, चख्खा, श्रीखंड, अंबरस, खिचडी ओले हरभरे यांचे डाळीचे वगैरे प्रत्यहीं एक प्रकाराची. पापड, सांडगे, फेण्या, तिळवडे, चिकवडया, मीरगोंडे बोडे, मेक्यांच्या काचर्‍या, चांगल्या कोशिंबिरी वीस प्रकारच्या. तिखट चटण्या चांगल्या बारीक वाटून रुचिकर कराव्या. निंबे चिरुन पंचामृत, रायतीं व भरते दोन, आदिकरुन पंचवीस तीस प्रकार करावे. एक दुसरी चमत्कारिक कोशिंबिरी करावी. विचारुन वाढावी. मीठ धुवून पांढरे बारीक करावे. हारीनें एकास एक न लागला हिराव्या, पिवळ्या, लाल, काळ्या वगैरे रंगाचे अनुक्रमाने मध्यें थेंब न पडता गलगल न करता वाटोळया वाढाव्या. हात धुवून मग दुसरी कोशिंबीर वाढीत जावी.

“भोजनसमयीं समया खाशाचे पंगतीस दोन पात्राआड एक व वरकड पंगतीस चार पात्रा आड एक याप्रमाणें उजळ समया वाती उजळून चांगल्या कोरडया न रहाता भिजवून तेल निवळ पांढरे असेल ते घालून पात्नावर न पाडता तजविजीनें झार्‍यानी समयावर घालावे. रुप्याच्या समया खासे पंगतीस मांडाव्या. त्याजवर तेल रुप्याचे झार्‍यानी घालावे. गुलदानानी गूल काढावे.

“सदर्हू साहित्य आचारी चांगले शहाणे लावून स्वयंपाक चांगला करावा. पात्रांचा अदमास पुसोन घेऊन दोन प्रहरात भोजने होत अशी तजवीज करावी. लोणची भाज्या वगैरे उष्ण रसाच्या, एक सारख्या हारीने वाटोळ्या वाढाव्या. एकास एक लावू नये. आंबटी, सांबारे, वरण, क्षीर, यांचे थेंबटे मध्यें पडू नयेत. तूप रुप्याचे तोटीच्या कासंडयानी वाढावे. प्यावयाचे पाणी गाळून शीतळ करावे. वाळा कापूर, उदवून ते सिद्ध करावे. सर्वांस भोजनसमयी व फराळसमयी देत जावे. भोजनोत्तर आंचवावयास उष्ण पाणी व हातास लावावयास साखर व दात कोरावयास लवंगा याप्रमाणें देत जावे.

“फराळाचे सामान-लोणची पाच प्रकारची व पापड, सांडगे. कोशिंबिरी दहा प्रकारच्या. पक्कान्ने व लाडू,पोहे आंबेमोहोर बारीक भात व खानदेशातून नवे पोहे आणवून ते व मातबरास लाह्या, खारीक, खोबरे, खजूर, बदाम, पिस्ते, नारळ, मेवा वगैरे. मेवामिठाई. दही,दूध, तूप साजूक व मध्यम, मुरंबे.

“विडे बांधणे ते हिरवे खर्ची पानांचा व बाजूचा सात पानांचा बांधावा, पिकल्या पटटया, बाजूच्या सात पानांच्या,सुपारीचे पानांची गुंडी उभी घालून भरदार चांगल्या बांधाव्या. कुलपी विडे, केळीची पाने लावून, दहा पानांचा एक व बारा पानांचा त्यांत गंगेरी दोन पाने घालीत जावी. त्यस दुकाडीची खूण करावी. सुपारी फुलबर्डा वगैरे चांगली पाहून धुवावी. त्यापैकी तबकात मोकळी घालावयाची त्यास केशराचे पाणी देऊन गुलाब घालून रंगदार करावी. कांहीं रोठा-सुपारीचे फूल पाडून ठेवावे. चिकणी सुपारी नुस्ती व खुषबोईदार करुन ठेवीत जावी. जुना केशरी व साधा पांढरा सफेत खासा सभेंत तबकात ठेवण्या करिता करावा."

अभिरुचीची सूक्ष्मता हीच संस्कृति. ती समाजाच्या सर्व प्रकारच्या व्यवहारात दृष्टीस पडली म्हणजे तो समाज तितक्या प्रमाणात व त्या त्या अंगानी सुसंस्कृत झाला, असें म्हणता येतें. भोजनसमारंभ हे त्यापैकी प्रमुख अंग होय. त्यांत समाजाच्या विविध मनोवृत्तींचे व सभ्याचारांचे प्रतिबिंब पहावयास सापडते. वर वर्ण केले आहे त्यावरुन पेशवेकालीन वरिष्ठ प्रतीचा महाराष्ट्रीयसमाज संस्कृतीचे बाबतीत जगातील कोणत्याहि समाजास हार जाणारा नव्हता, इतकेच नव्हे तर मद्यमांसनिवृत्तीने तो पाश्चात्य देशातील सर्व समाजाहून श्रेष्ठ होता असेच कबूल करावें लागेल. इंग्लंड हे हल्लीप्रमाणें त्याहि काळी दारुबाजीत बुडाले असून खुद्द लंडन शहरांतील गुत्ते दारुबाजानी रात्रंदिवस गजबजलेले असत.

लॉर्ड व्हँलेंटिया पुण्यास १८०३ मध्यें आला होता. त्यावेळीं पुण्याचा रेसिडेंट सर बारी क्लोज हा होता. त्या दोघांना दुसर्‍या बाजीरावानें मेजवानी दिली. तिची हकीकत क्लोज यानें लिहून ठेवली आहे. तो लिहितो, “चार वाजल्यानंतर आम्ही स्वारीसह हिराबागेंत पेशव्याला भेटावयास निघालो. वाटेनें पेशव्याच्या स्वारीतील घोडेस्वार वगैरे गर्दी होती. म्हणून आम्हाला फाटकांतून (Gate) आंत शिरण्यास प्रयास पडले. माझ्याबरोबर आमच्या लायनीतील शिपायांची तुकडी होती म्हणून बरें झाले. ही बाग एका विस्तीर्ण तळयाच्या कांठीं आहे. तळ्याच्या मधील बेटांत एक देवालय आहे. बागेतील घर सामान्य प्रतीचे आहे. बाग सुरेख असून तिच्यांत मोठाली आंब्याची झाडे व पुष्कळ नारळी आहेत. पेशव्यांची गादी पडवीत होती. समोर कारंजी असून त्याभोवती द्राक्षवेळी सोडल्या होत्या.

‘मग आम्ही अरुंद जिन्यातून माडीवर गेलो. माडी कलमदानी होती. तिच्या दोन्ही बाजूला पडव्या होत्या. पलीकडच्या अंगाला पांढरी बैठक असून त्यावर आम्हा इंग्रज गृहस्थाकरितां केळीची पाने मांडली होती. त्यावर ब्राह्मणी पद्धतीचे जेवण वाढले असून त्यांत भात, पापड, पापडया, करंजा इत्यादि पदार्थ होते. एका ओळीला रंगारंगाची पक्कान्ने होती व दुसर्‍या ओळीला सात प्रकारच्या चटण्या कोशिंबिरी होत्या. पानाच्या एका अंगाला खीर, तूप व दुसरे पातळ पदार्थ होते. हे सर्व पदार्थ उत्कृष्ट बनविले होते. आम्ही आपल्याकरितां स्वतःबरोबर काटे, चमचे व सुर्‍या आणिल्या होत्या. त्यांचा आम्हीं हवा तसा उपयोग केला. बाजीरावसाहेब पलीकडे गादीवर बसले होते. पण आमच्यासमोर जेवावयास बसून त्यांनीं आपणांस भ्रष्ट करुन घेतले नाहीं." (पूना इन बायगॉन डेज).

संदर्भ आणि आभार  -  पेशवेकालीन महाराष्ट्र,  लेखक-वासुदेव कृष्ण भावे, डिसेंबर सन १९३५.

Unknown

1 comment:

amol said...

सुंदर.
लिहित राहा.