दरवर्षी प्रमाणे, ज्येष्ठ महिना आला आणि वारीचे वेध लागले, वेध कसले? पांडुरंग दर्शनाचे, संतांच्या सहवासाचे. महाराष्ट्र, महाराष्ट्राबाहेरील प्रांतांतून वारकरी आळंदी, देहूला जमू लागले. आठशे वर्षांपूर्वी सुरु झालेला हा सोहोळा अखंड सुरू आहे. ज्ञानेश्वरांचे आई वडीलही नेमाने पंढपूरला जात. तुकोबारायांच्या घराण्यातही वारी होती.तुकोबारायांनी वारीला सामुदायिक रूप दिले.
तुकोबांच्या वैकुंठगमनानंतर त्यांचे धाकटे बंधू कान्होबा, त्यानंतर नारायणबाबा यांनी ही प्रथा पुढे सुरू ठेवली. नारायणबाबांनी तुकोबारायांच्या व ज्ञानोबांच्या पादुका सोबत घेऊन वारी सुरू केली. "ज्ञानोबा-तुकाराम' हा भजनघोषही त्यांनीच दिला. नारायणबाबा तुकाराम महाराजांच्या पादुका सप्तमीला पालखीत ठेवीत आणि अष्टमीला आळंदीला जात. तेथे ज्ञानोबारायांच्या पादुका घेत आणि तेथूनच नवमीला वारीला निघत. १६८० ते १८३२ पर्यंत ही प्रथा कायम राहिली.
हंबीरराव प्रथम वारकरी म्हणून ओळखले जातात. शिंदे यांचे आरफळ येथील सरदार हैबतराव पवार-आरफळकर यांनी १८३२ मध्ये माऊलींची पालखी आळंदीहून स्वतंत्रपणे नेण्यास सुरवात केली. त्यांना अंकलीच्या सरदार शितोळे यांनी मदत केली. ते ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका म्हणे गळ्यात बांधून पंढरपूरपर्यंतची वारी पायी करीत. माऊलींच्या पालखीचा श्रीमंती थाट तेव्हापासून आजतागायत कायम आहे. लष्करी शिस्तीचा सोहळा हैबतबाबांनी माऊलींची पालखी स्वतंत्र सुरू करतानाच, या सोहळ्याला शिस्तही लावली. हि शिस्त वारकर्यांनी कोणाच्याही नेतृताशिवाय पाळली.
श्री संत ज्ञानेश्वर व श्री संत तुकाराम यांच्या पालख्या पुण्यात म्हसोबा नाक्यावर (नवमीला सायंकाळी) भेटतात. त्यानंतर माऊलींची पालखी भवानी पेठेत विठोबाच्या देवळात, तर तुकाराम महाराजांची पालखी नाना पेठेत निवडुंग्या विठोबा मंदिरात मुक्काम करते. दशमीला विश्रांती घेऊन एकादशीला दोन्ही पालख्या मार्गस्थ होतात.
संत तुकाराम महाराजांची पालखी हडपसर, लोणी, यवत, वरवंड, पाटस, बारामती, अकलूज या मार्गे पंढरपूरला जाते.तर माऊलींची पालखी सासवड, जेजुरी, वेल्हे, लोणंद, तरडगाव, फलटण, नातेपुते, माळशिरस या मार्गे पंढरपूरला जाते.
तारीख ९ जुलैला पालख्या पुण्यात मुक्कामी य्रेऊन ११ तारखेला पंढरपूरकडे मार्गस्थ होतील. वारकरी आपली सर्व खरेदी पुण्यातच करतो. त्यात प्रामुख्याने पावसापासून संरक्षणासाठी प्लॅस्टीकचे कापड खरेदी केले जाते. पुणेकरांचे अहोभाग्य, दोन्ही पालख्यांचे दर्शन होते. पुण्यात जागोजागी वारकरी भोजन दिले जाते. सकाळचा चहा, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण दिले जाते.
पालखी सोहळ्यात ज्ञानदेव महाराजांच्या पालखीपुढे 27 व मागे 105 दिंड्या आहेत. तुकाराम महाराजांच्या पालखीपुढे 18 व मागे 69 दिंड्या आहेत. काही वर्षे सातत्याने पालखीबरोबर चालल्याशिवाय पालखी सोहळा दिंडीला मान्यता देत नाही.
पुण्याबद्दल थोडेसे - इ.स. ८ व्या शतकात पुणे 'पुन्नक' (किंवा 'पुण्यक') नावाने ओळखले जात असल्याचे संदर्भ सापडतात. इ.स. ११ व्या शतकात पुणे 'कसबे पुणे' किंवा 'पुनवडी' नावाने ओळखले जाऊ लागले. नंतर "पुण्यनगरी"नावाने ओळखले जाउ लागले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडात या शहराचे नाव 'पुणे' असे वापरले जात होते. आता हे शहर "पुणे" या अधिकृत नावाने ओळखले जाते.
तारीख ९ जुलैचा कार्यक्रम
पुण्यात आगमन आणि मुक्काम.
मुक्कमाचे ठिकाण
ज्ञानेश्वर माऊलींची पालखी-पालखी विठोबा मंदीर भवानी पेठ, पुणे.
तुकाराम महाराजांची पालखी- श्री निवडुंगा विठोबा मंदीर नाना पेठ, पुणे.