पंढरीची वारी-वारकरी

उद्या शुक्रवार १३ जुलै रोजी सकाळी ६ वाजता माउलींची पालखी जेजुरी कडे मार्गस्थ होईल. सासवडमध्ये आपले बंधू आणि गुरू निवृत्तीनाथांचा आशीर्वाद घेउन माउली विठ्ठल भेटीसाठी, वारकर्‍यांसोबत पंढरपूरला निघतात.   
'माझे जीवीची आवडी । पंढरपुरा नेईन गुढी ॥'' हा भाव अंतरी ठेवून खांद्यावर पताका, मुखाने हरिनाम आणि टाळ-मुदुंगाच्या गजरात पावले पंढरीकडे आपोआप चालतात. 

पांडुरंगाच्या सेवेनं, प्रेमानं देव प्रसन्न होतो. पण देवाजवळ मागणे काहीही नाही. वारकरी संप्रदायाचं हे मूळ आहे. येथे देव-भक्ताचं नातं नाही, ते माता-मुलाचं नातं आहे. येथे बाळ आईची किती वाट पाहतं नाही. आईचे डोळे मात्र बाळासाठी आसुसलेले असतात.
"वाट पाहे उभा भेटीची आवडी
कृपाळू तातडी उतावीळ'
जर देव पांडुरंगच आमची वाट पाहत असेल, तर आम्ही त्याच्यापाशी धावत का जायचे नाही? ही तर सख्याचं दर्शन घेण्याची वारी असते. ’भेटीलागी जीव लागतसे आस’ अशी आस लागलेली असते, तेव्हाच जगाचा विसर पडून पावले आपोआप टाळ मृदुंगाच्या गजरात नाचू लागतात.

पालखी जेजुरीला येणार, आणि वारकरी खंडोबारायाचे दर्शन घेणार, त्यात पांडुरंगाचे रूप पाहणार.

जेजुरीबद्धल थोडेसे-जेजुरीला खंडोबाचे मंदीर आहे. मंदीर गडावर असून साधारण २०० पायर्‍या आहेत. मुख्यतः धनगर लोकांचे भक्तिस्थान आहे. शिवाजीमहाराज नेमाने दर्शनाला येत. खंडोबाला मल्हारी मार्तंड सुद्धा म्हणतात. गजर करताना ’येळकोट येळकोट जय मल्हार’ म्हणतात. येळकोट म्हणजे कानडीत, येळू म्हणजे सात आणि कोट म्हणजे कोटी, खंडोबाचे सात कोटी सैन्य होते. खंडोबाला भंडारा खोबरे उधळले जाते. 

माउलींची पालखी १४ जुलै,शनिवारचा मुक्काम-वाल्हे

तुकाराम महाराजांची पालखी १४ जुलै, शनिवारचा मुक्कम-उंडवडी गवळ्याची

 १२ जुलै २००७ 

Unknown

No comments: