गांधारीची शक्ती

महाभारतातील एक प्रसिद्ध कथा आहे.

धृतराष्ट्र जन्मजातच अंध होता, पण तो हस्तिनापूरचा राजा झाला, त्याची बायको गांधारी तिने पतिव्रतेचे पालन करून आयुष्यभर आपल्या डोळ्यावर पट्टी बांधली. आयुष्यभर डोळे असून आंधळेपणाने आयुष्य घालवले.

जेव्हा महाभारतातील युद्ध संपत आले, आणि सर्व नष्ट झाले, फक्त कौरव आणि पांडवच उरले, आणि भीमाने द्वंद्वयुद्धाला दुर्योधनाला आव्हान दिले. दुर्योधनाने ते स्विकारले. दुर्योधन मग आईचा आशिर्वाद घेण्यासाठी जाणार होता, कारण हा शेवटचेच युद्ध होते, कारण यात एकाचे मरण निश्चित होते. हे श्रीकृष्णाला समजले, आणि तो त्या दुर्योधनाकडे गेला, तेव्हा त्याला समजले की गांधारीने दुर्योधनाला एकही कपडा अंगावर न ठेवता आंघोळ करून आशिर्वाद घ्यायला बोलावले आहे.एवढ्या मोठ्या मुलाला एकट्यालाच विवस्त्र का बोलवावे, या विचारात कृष्ण  पडला. तेव्हा त्याला अंतर्ज्ञानाने गुपीत समजले.

कृष्ण दुर्योधनाकडे सहज (सहज कुठला)  म्हणून गेला, तेव्हा नुकताच दुर्योधन आंघोळ करून आईचा आशिर्वाद घेण्यासाठी चालला होता. तेव्हा कृष्ण म्हणाला, बाबारे असा कसा तू आईसमोर जाणार, कमीतकमी कंबरेला तरी गुंडाळ. दुर्योधन लाजला आणि त्याने जवळच असलेल्या केळीच्या झाडाचे पान कंबरेला गुंडाळले, ते पार मांड्यांपर्यंत खाली आले. शेवटी कितीही आईसमोर जायचे असेल तरी लाज वाटतेच ना?

दुर्योधन आईसमोर आला, प्रणाम केला आणि आशिर्वाद मागितला, आणि काय आश्चर्य गांधारीने आशिर्वाद देण्यासाठी चक्क डोळ्यावरची पट्ट काढली, आणि दुर्योधनाकडे पाहिले, आणि रागाने लालबुंद झाली आणि म्हणाली," मी तुला विवस्त्र होऊन यायला सांगितले होते ना? बघ तुझे सर्व अंग लोखंडासारखे अभेद्द्य झाले आहे, कोणतेही शस्त्र त्यावर चालणार नाही. तू अजिंक्य झाला असतास, पण तुझे दुर्दैव. तुझी मांडीवर प्रहार होऊ शकतो"

पतिव्रतेप्रमाणे गांधारीने डोळे जे आयुष्यभर बंद ठेवले होते त्यात ताकद आली होती, आणि ही कृष्णाने ओळखली होती, त्याचाच फायदा घेत, भीम दुर्योधनाच्या द्वंद्वयुद्धात कृष्णाने भीमाला दुर्योधनाच्या मांडीवर गदाप्रहार करण्याची खूण केली होती.

तपश्चर्येचे फळ काय असू शकते, ते यावरून समजते.

Unknown

No comments: