संध्या आणि जानवे

पुण्यात दि.२४ जानेवारी २००९ रोजी बहुभाषिक ब्राम्हण महाअधिवेशन झाले. खू्पसे मान्यवर महाराज, स्वामी, विचारवंत, ज्ञानी, राजकारणी, नेते मंडळी उपस्थित होती. मुळात असे जातीविषयक अधिवेशन भरवणेच गैर. त्याने जातीवादाला चालना मिळते. ब्राम्हण वर्ग म्हणजे ज्ञानी समजला जातो. कारण त्यांच्याकडे ज्ञानदानाचे कार्य होते. धर्माची व्याख्या करण्याचे काम होते. कोणत्याही विषयावर मतभेद झाल्यास, त्यावर साधकबाधक चर्चा, वादविवाद करून त्यावर मत ठाम करण्याचे काम ब्राम्हणांना शोभा देते, अरेरावीच्या जोरावर एखाद्याचे म्हणणे खोडण्याचे पाप कसे करू शकतात देव जाणे.

या अधिवेशनात डॉ. अश्निनी घोंगडॆ म्हणाल्य," आजच्या काळात संध्या नाही केली तरी चालेल, जानवे नाही घातले तरी चालेल. त्याने ब्राम्हणत्व कमी होत नाही." यावर तेथे बराच गोंधळ झाला.अनेक श्रोते व्यासपीठाकडे धावून गेले, त्यांचे भाषण बंद पाडले. खरेतर या विषयावर चर्चा अपेक्षित होती. अजूनही ब्राम्हणांना संध्या, जानवे ओळखीसाठी लागते.

त्याच अधिवेशनात रामदेवबाबा काय म्हणाले," काही ब्राम्हण, पंडित तंबाखू आणि गुटखा चघळताना दिसतात. मग पुढे मांस दारूही ओघाने येते. या पुढे असेच वागाल तर निश्चितच संस्कृतीचे पतन होईल, म्हणून या अधिवेशनातून जाताना व्यसने सोडा." यावर कोणी काहीही बोलले नाही. संध्या करायची, जानवे घालायचे आणि व्यसने करायची, हे कोणत्या बुद्धीवंताच्या आचरणात बसते. रामदेवबाबांच्या वक्तव्यावर सर्व शांत होते, कोणी कसे म्हणाले नाही की ब्राम्हण व्यसने करीत नाहीत. असा शपथविधीचा कार्यक्रम कसा झाला नाही, असा ठराव का केला गेला नाही. मांसाहारी हॉटेलमध्ये गेल्यास कोणाची जास्त हजेरी असते हे न बोललेलेच बरे. संध्या नाही केली तरी चालेल, जानवे नाही घातले तरी चालेल, पण आचारधर्म पाळा ना?

जेव्हा पृथ्वीवर मानव निर्माण झाला  तेव्हा रानटी अवस्थेत मानवात जात होती काय? नव्हती. पण नंतर काही लोक इतरांना चार समजुतीच्या गोष्टी सांगू लागले, तेव्हा त्यांचा एक वर्ग निर्माण झाला, तोच ब्राम्हाण वर्ग. काही निधड्या छातीचे, बलदंड लोक शौर्य गाजवू लागले, त्यांना क्षत्रिय म्हणू लागले. अशा प्रकारे कर्माप्रमाणे जाती नि्र्माण झाल्या.

ब्राम्हणेतरांनी संध्या केली, जान्हवे घातले. मांस भक्षण नाही केलेतर, तो ब्राम्हाण होऊ शकतो काय? ब्राम्हणात रोटी बेटी व्यवहार होईल काय?

Unknown

No comments: