२६ जानेवारी

२६ जानेवारी १९५० रोजी भारतची राज्यघटना मान्य झाली, आणि तत्वतः याप्रमाणे देशाचा कारभार करावा आणि  त्या राज्यघटनेपेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही, हे एकदा मान्य झाले. किती हुतात्म्यांच्या रक्ताने ही राज्यघटना, खरेतर लिहीली गेली. जगाच्या मंचावर महासत्ता बनण्याची स्वप्ने घेऊन आज भारत मार्गक्रमण करीत आहे, या पार्श्वभूमीवर राज्यघटना साठाव्या वर्षात पदार्पण करीत आहे. ही अभिमानाची गोष्ट आहे, परंतु खरेच तसे झाले काय, ही आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. नाहीतर १०० वर्षांनी राज्यघटना म्हणजे काय हे त्या पिढीला सांगावे लागेल. राज्य घटना जन्माला तीच मुळी नानाविध जाती, धर्म पंथ, भाषा, संस्कृती यांच्या कमकुवत पायावर. कारण राज्यघटना लिहीताना भविष्यात काय परिणाम होतील याचा विचारच केला गेला नव्हता. भारत हे हिंदू राष्ट्र आहे, इथे हिंदूंनाच प्राधान्य मिळावयास हवे याचा, स्वतःला महान  बनविण्याच्या नशेत, घटनाकर्त्यांना विसर पडला होता. 

जगात खूपसे देश या मागच्या पन्नास एक वर्षात निर्माण झाले, त्यांनी घटना बनविली नाही, पण देश सुरळीत कारभार करताहेत. भारतात घटनेचे आपल्या मर्जीप्रमाणे, सोईनुसार अर्थ काढून देशाचे पार वाटोळे करून टाकले आहे, त्यापेक्षा ही घटना नसती तर बरे झाले असते, असे वाटते. आज असे लोकही जिवंत आहेत की, ज्यांनी इंग्रजांचा काळ अनुभवला आहे, आणि ज्यांनी स्वातंत्रयुद्धात भाग घेतला  होता, ते  सुद्धा उद्वेगाने म्हण्तात, इंग्रजांचा काळ बरा होता. बकासूर परवडला तो रोज एकच माणूस खात होता, पण आज घाऊक पद्धतीने माणसे मुंग्यांसारखी चिरडली जाताहेत.

राज्य कारभार करणारे लोकप्रतिनिधी, मंत्री राज्याघटनेप्रती, सचोटीने वागण्याची शपथ घेतात, सत्ता स्विकारतात, त्याप्रमाणे वागतात काय? कायद्याचा अर्थ सांगणारी, एवढीच राज्यघटना नसून आचारविचार, तारतम्य, राज्यप्रणाली म्हणून तिचे महत्व अनन्यसाधारण आहे. एखाद्या ध्रर्माला धर्मग्रंथाचे जेवढे महत्व आहे तेवढेच देशाला घटनेचे महत्व आहे. गीता किंवा वेदांमधून धार्मिक संहीता सांगितलेली आहे, पण त्याच बरोबर राज्यघटना अचारली गेली तर सोन्याचा धूर निघतो, नाहीतर उगीचच धग राहून धूर होतो.आज या राज्यघटनेचे द्रौपदी वस्त्रहरण झाले आहे, लाज राखण्यासाठी श्रीकृष्णाच्या वस्त्रांची गरज आहे.

याच राज्य घटनेचा सोईस्कर अर्थ लाउन नागरीकांच्या स्वातंत्र्याचा गळा घोटण्यासाठी, आणीबाणी लादली गेली होती, हे विसरून चालणार नाही. राज्यघटना किती प्रभावी आहे, हे सर्वस्वी ती राबणार्‍यावर अवलंबून असते.  राज्यघटनेचे यश अपयश तोलण्याची आज वेळ आलेली आहे, साठाव्या वर्षी हे तरी करूय यात.

धर्मनिरपेक्षतेचा संदेश देता देता, धर्माच्या मूलतत्वांना कसा सुरूंग लावला गेला, अन्य धर्माचे लाड करताना आपलाच धर्माला कशी सापत्न भूमिका दिली गेली, याचा विसर पडत आहे. धर्माबद्दलची कलमे, जास्त ती्व्र करण्याची, बदलण्याची आज गरज आहे, नाहीतर धार्मिक संघर्ष होण्यास वेळ लागणार नाही.

भ्रष्टाचार, अत्त्याचार, आर्थिक घोटाळे, धार्मिक विषमता, स्वैराचार हे सर्व केवळ घटना राबवली गेली नाही म्हणून भारतीय जनतेला भोगावे लागत आहे. सामान्य माणूस राज्यघटना राबवू शकत नाही, पण राज्यघटने प्रमाणे वागण्यासाठी ते मतदान करून नेता निवडतो, पण त्यानेच पाठीत खंजीर खुपसल्यास त्याचा न्याय कोण करणार. राज्यघटना राबवण्याची जबाबदारी न्यायालये, पोलीस, राज्यकर्ते, पुढार यांच्यावर आहे, पण तिथेच भ्रष्टाचार एवढा आहे की, भयानक गढूळपणा आलेला आहे.

राज्यघटना कागदावरच ठेवायची, की ती योग्य प्रकारे राबवायची हे ठरविण्याची वेळ आलेली आहे. राज्यघटनेतील प्रत्येक कलम हे ईश्वरवचन आहे, असे मानले तर पुन्हा भारतात सुवर्णकाळ येईल.

साधे चित्र जेवढे चांगले दिसते, त्याही पेक्षा ते काचेच्या फ्रेम मध्ये अजून मोहक दिसते, कारण त्याला बंधन असते. १५ ऑगष्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले, पण तेच जेव्हा २६ जानेवारीला १९५० रोजी राज्यघटनेच्या फ्रेम मध्ये बंदिस्त झाले, तेव्हात त्याला एक प्रकारची झळाळी आली.

६० व्या प्रजासत्ताक दिनी सर्वांचे अभिनंदन.

Unknown

No comments: