काही वर्षांपूर्वी शाळेतील मुलांना ’परिक्षा’ या विषयावर चित्र काढायला सांगितले तेव्हा मुलांनी राक्षसाचे चित्र काढले. यावरून मुलांच्या मनात परिक्षेविषयी किती भिती आहे याचा अंदाज येतो. त्यांच्या मनात नकारात्मक भावना आहे हेच जाणवते. यावरून असा बोध होतो की, त्यांच्याकडे कानाडोळा करून चालणार नाही. जशा आपण मुलांकडून अपेक्षा करतो, त्याच प्रमाणे मुलांनाही पालकांकडून काही अपेक्षा असतातच ना? मुले नेहमी पालकांकडे आशेने बघत असतात. लहान मुलांना बागुलबुवाची भिती दाखवली, किंवा मुले घाबरली तर त्यांना आईच्या पदराशिवाय दुसरी सुरक्षित जागाच सापडत नाही.
पालकांनो जरा कामाधंद्यातून वेळ काढून मुलांच्या समस्या समजावून घ्याव्यात. चांगल्या शाळेत, मोठे डोनेशन देऊन घातले, आणि मोठा क्लास लावला म्हणजे आपले कर्तव्य संपले असे समजू नका. मुलांना शाळेत काही ताणतणाव आहे का? याची चौकशी करा. कधीकधी काय होते वर्गातील एखादा बंड मुलगा त्रास देत असतो, आणि आपला मुलगा त्याला घाबरून शाळेत जात नाही म्हणतो, मग त्याला धाक दाखवून शाळेत पाठविल्यास त्याची घुसमट होते आणि तो मग सगळे मार्ग संपल्यावर अतिरेकी होतो. त्याला जवळ बसवून त्याची विचारपूस करा.
आपल्याला सर्वांना मुलांची काळजी असते, आणि काळजी असावी, पण नुसतीच असू नये त्यासाठी सजग असावे. मुलांवर कोणतेतरी दडपण नाही ना, याची खात्री करावी. आपल्याला पाल्याची काळजी वाटते, हे मुलांना पटविण्यासाठी त्यांच्याबरोबर आपुलकीने मैत्रीपूर्ण संवाद साधावा, त्याच्याशी मित्रत्वाच्या नात्याने बोलावे. त्याच्या समस्या जाणून घ्याव्यात. त्याला अभ्यासाचे ओझे वाटत नाही ना ते पाहावे. शनिवार रविवारी मुलांना बागेत न्यावे, त्यांना काय हवे नको ते पहावे, म्हणजे मुलांना वाटते एक दिवस का होईना आईबाबा आपल्याल वेळ देतात, त्यामुळे मुलांची मने फ्रेश होतात. मुलांना आवडणारे पदार्थ शक्यतो घरीच उपलब्ध करून द्या. त्यांच्या आहारावर जातीने लक्ष द्या, नोकरांवर सोडू नका. रोज झोपण्यापूर्वी त्याची आपुलकीने चौकशी करा. त्यालाही बरे वाटेल.
शेवटी आपण सर्व कुणासाठे करतो, मुलांसाठीच ना? लक्षात घ्या मुलेच आपली भविष्यकाळ आहेत.