दहावीचा अभ्यास कसा करावा - २

काल दहावीचा अभ्यास करताना वेळेचे नियोजन कसे करावे ते आपण पाहिले. दहावी ही महत्वाची आहेच पण त्यासाठी टेन्शन घेऊ नका. शांतपणे अभ्यास केला तर सर्व सुरळीत होईल. एवढा अभ्यास कसा होईल? मला हे सर्व जमेल का? दिवस थोडेच राहिलेत, मग आता मी कसा अभ्यास करू? ह्या सर्व काळज्या आता सोडा. कारण काळजी करण्याची वेळ गेली आहे. उरलेल्या वेळेचा उपयोग करून घ्या. एकेक विषय पूर्ण करा. जसजसा अभ्यास पुढे जाईल तसतसी काळजी कमी होत जाईल. अवघड विषय कुठला आहे, त्याचा अभ्यास पहिल्यांदा करा. सोपा विषय वेळेवर सुद्धा करता येतो, कारण तो सहज पार होतो. किती सोपं असतं पहा. गणित जमत नाही ना? काल आम्ही सांगितल्या प्रमाणे गणिताचा अभ्यास करा, म्हणजे पाचही प्रश्नपत्रिकेतील पहिला प्रश्न सोडवायचा, जर तो बरोबर झाला तर झाले ना १० मार्क. आठ प्रमेय पाठ करा, दोन परिक्षेला येतात, झाले ना आठ मार्क. त्याचप्रमाणे क्षेत्रफळ,  घनफळाची  फक्त सूत्रे पाठ करा, बघा कशी गणिते फटाफट सुटतात, याचे सहा मार्क मिळतात, मग झाले ना २४ मार्क. कशाला पाहिजे बाकी काय? अशा प्रकारे प्रश्न आणि मार्क निश्चित करा, आणि त्याच प्रमाणे अभ्यास करा, सर्व सोपे होऊन जाईल.

जिथे पुस्तके, वह्या ठेवता त्याठिकाणी नीट मांडणी करा. एका विषयाचे पुस्तक, त्याचे गाईड (असेल तर), वह्या, पुस्तिका वगैरे एकच ठिकाणी ठेवा म्हणजे त्या विषयाचा अभ्यास करताना सर्व साहित्य एकाच वेळेस मिळेल, शोधायला वेळ जाणार नाही. आणि अभ्यास झाल्यावर ते सर्व साहित्य जागेवर ठेवल्याशिवाय दुसर्‍या विषयाला हात घालायचा नाही. एकापेक्षा जास्त मित्रांना सोबत घेऊन अभ्यासाला बसायचे नाही, त्याने मतांतरे होतात आणि अभ्यास होत नाही. शिवाय मित्रांची संवय होते आणि एकादा मित्र जर आला नाही तर अभ्यासाला मूड येत नाही. शिवाय गोंधळ जास्त होतो. सर्वात उत्तम आपण एकट्यानेच अभ्यास करणे. कारण आपणच आपले गुरू असतो.

आता पासूनच आहार हलका ठेवा.पचायला जड आहार नको. कारण आजारपण आल्यास नुकसान होईल. पोट सांभाळा. जागरण करू नका, त्याने पोट बिघडते मग सगळे वेळापत्रकच बिघडते. चिडचिड करू नका. आणि महत्वाचे वेळेवर आहार घ्या. अजिबात उन्हात फिरू नका.

बाकी उद्या.

Unknown

No comments: