विद्यार्थ्यांची आत्महत्या

स्पर्धेच्या तणावातून मुंबईत तीन विद्यार्थ्यांच्या आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा

Monday, January 04, 2010 AT 11:24 PM (IST)

मुंबई - पालकांच्या अपेक्षांचे ओझे आणि शैक्षणिक क्षेत्रातील तीव्र स्पर्धेचा ताण असह्य झाल्याने शहर आणि उपनगरांतील तीन वेगवेगळ्या वयोगटांतील विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. या तिघांच्या आत्महत्यांची कारणे वरवर वेगळी वाटत असली, तरी वैफल्यग्रस्तता हा यातील समान धागा आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.चार विषयांत अनुत्तीर्ण झाल्याने सुशांत पाटीलने शाळेच्या स्वच्छतागृहात आत्महत्या केली, तर वैजंतीकौर बुलेर हिने दोन विषयांत अनुत्तीर्ण झाल्याने घरात गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. वडिलांनी नृत्याऐवजी अभ्यासाचा सल्ला दिल्याने नेहा सावंत हिने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

वरील बातमी वाचून मन सुन्न होऊन जाते. आपण शिक्षणाच्या बाबतीत कुठे जाणार आहोत, आणि ही जीवघेणी स्पर्धा कधी संपणार आहे देव जाणे. या आत्महत्येसाठी सर्वस्वी पालक आणि शाळाच जबाबदार आहेत. अभ्यास तरी किती असावा, काहीही नियम नाहीत. मुळात सर्व भयंकर आहे.

याच ब्लॉगमधून आम्ही आधीही लिहीले होते की, अभ्यासाचे आणि अभ्यासक्रमाचे नियोजन फार महत्वाचे आहे. आम्ही सांगितले होते, आजकालच्या जीवानात जगण्यासाठी पैसा महत्वाचा आहे, आणि शिक्षण कशासाठी आणि अंतिम काय तर चांगली नोकरी, धंदा आणि यासाठी शिक्षण.

कशाला पाहिजे भूगोल आणि इतिहास. काय गरज आहे, हुमायुन कोण होता? वाळवंटी प्रदेशातील लोकांचे जीवनमान काय? गरज नसताना मुलांनी अभ्यास करायचा, स्पर्धा गाजवायच्या. गणितातील समिकरणे, पायथॅगोरसचा सिद्धांत, ज्या जीवा काय करणार आहोत त्यांचे आपल्या सर्वसामान्य जीवनात? एकदा दहावीची परिक्षा पास झाल्यावर, नंतर जेव्हा मुलगा डॉक्टरकीला जातो तेव्हा या सर्वांचा काय उपयोग? मुले परिक्षेनंतर सगळे विसरून जातात, तर मग मुलांनी एवढे टेन्शन घेऊन का जगावे? या शिक्षण पद्धतीत बदल करणे जरूरीचे आहे.

हे सर्व कमी करा आणि मुलांना व्यावसायिक ज्ञान द्या, त्यांच्या कलाने प्रगती करू द्यात, तेच काय तर भारताचे भविष्यही उज्ज्वल होईल. मुलांना व्यवहारज्ञानाची गरज आहे. रहदारीच्या नियमांची गरज आहे. भ्रष्टाचाराचे तोटे सांगून तो कसा समूळ नष्ट करावा याचे ज्ञान द्या. सरकारी शाळांमधून शिक्षणाची उंची वाढवा. आत्महत्या कमी होतील. 

Unknown

No comments: