न्यायदान

 

ही बातमी आहे, दैनिक ’सकाळ’ मधील भारतीयांवरील, ऑस्ट्रेलियातील हल्ल्यांसंदर्भात.

व्हिक्‍टोरिया शहरातील टॅक्‍सीचालक सतीश थत्तीपामुला (वय 24) याला पॉल जॉन ब्रॉगडेन (वय 48) याने दारूच्या नशेत वर्णद्वेषातून शिवीगाळ करत मारहाण करत, त्याच्या टॅक्‍सीचीही मोडतोड केली. पोलिसांनी आज सकाळी त्याला न्यायालयात हजर केले. न्यायालयात ब्रॉगडेनचे वकील फिलिप लॅंच यांनी सांगितले, की ब्रॉगडेन याने भरपूर मद्यप्राशन केल्यामुळे काल रात्री काय झाले, हे त्याला आठवत नाही. न्यायालयात सांगितलेल्या घटनाक्रमानुसार ब्रॉगडेनने एका पार्टीत भरपूर मद्यप्राशन केल्यानंतर बुधवारी रात्री स्थानिक वेळेनुसार सुमारे दोन वाजता एक टॅक्‍सी भाड्याने घेतली. त्याने पार्टीत अमली गोळ्याही खाल्ल्या होत्या. टॅक्‍सीतील इतर प्रवासी जेव्हा त्याला शिवीगाळ करू लागले तेव्हा भारतीय चालकाने त्याची टॅक्‍सी तत्काळ एका सर्व्हिस स्टेशनमध्ये नेली. तेथे ब्रॉगडेनने चालकास मारहाण केली.
ब्रॉगडेनला मद्यसेवनप्रकरणी यापूर्वी शिक्षा झाल्याचे सरकार पक्षाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. या प्रकरणी न्यायाधीश मिचेल हॉगसन यांनी निर्णय देत ब्रॉगडेनला तीन महिन्यांची शिक्षा सुनावली. समाजात मद्यप्राशन करून हिंसाचार करण्याची वृत्ती वाढीस लागणे, ही बाब चिंताजनक आहे. वर्णद्वेषातून हल्ले करणे, हा प्रकार कधीही खपवून घेतला जाणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.

 

कल्पना करा असा प्रकार आपल्या भारतात घडला असता तर? तो हल्लेखोर उजळ माथ्याने फिरून शिवाय गुन्हा नाकारून,  मोठा वकील देऊन मोकळा झाला असता. मग तारखांवर तारखा. तो खटला उभारण्यासच दोन चार वर्षे गेली असती. त्यात कितीतरी साक्षीदार तपासले गेले असते. शेवटी न्याय मिळण्याची आशा धूसर होते, आणि लोक ही घटना विसरून जातात.

पहा ऑस्ट्रेलियातील न्यायालयाने पोलीसांचे म्हणणे ग्राह्य धरून आरोपीला शिक्षा सुनावली. ऑस्ट्रेलियात जर चुकूनही चुकीचे पार्किंग झाले तर पोलीस गाडीवर दंडाची पावती लावून जातो, बस त्या माणसाने दंड भरायचाच. कोणत्याही सबबी चालत नाहीत. आणि तो पोलीसही ऐकत नाही. लाच हा प्रकार तर नाहीच. कोठेही दलाल नाहीत, बस आपले काम आपणच करायचे. आणि ते काम सरकारी कर्मचारी इमानदारीने करतो.

इथे तर म्हणे न्यायालयातही आर्थिक व्यवहार चालतात, आणि ते आर्थिक व्यवहार करणारेही दलाल असतात. कसा लोकांना न्याय मिळणार?

खटले वर्षानुवर्षे चालत राहतात, आजोबाची केस नंतर नातू चालवतो, त्याला सुद्धा न्याय मिळण्याची खात्री नसते.

२६-११ च्या हल्ल्यातील कसाबची केस कशी मस्त चाललीय. त्याने केलेल्या गुन्ह्याचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत, T.V. वर आख्ख्या जगाने पाहिलेय, एवढा पुरावा न्यायालयाला पुरेसा नाही काय? त्या कसाबचे लाड पुरवत, जणू तो आपला पाहुणाच आहे आणि त्याच्यावर अन्याय होतो आहे, अशा थाटात खटला चाललाय. त्याला काळजीच नाही, जरी फाशीची शिक्षा झाली तरी तरी आधीची फाशीची शिक्षा झालेले आरोपी नंबरात आहेत ना. तेव्हा याचा नंबर लागेल तोपर्यंत आख्खे आयुष्य निघून जाईल, हे त्याला चांगले माहीत आहे. शिवाय आत आरामच आराम, रोज मेजवानी.

आता आपल्याकडील कायदे आणि न्यायदानाच्या पद्धती बद्लायला पाहिजेत. टाईम लिमीट पाहिजे. त्यासाठी न्यायालयांचे कामकाज दोन पाळ्यांमध्ये चालले पाहिजे हे आम्ही मागेच या ब्लॉग मधून लिहीले होते. आताच्या कामकाजाच्या वेळा आणि कामकाजाची पद्धत पाहिल्यास अडाणी माणसालाही कळेल की न्याय उशीरा का मिळतो ते.

आता आपल्याला काहीतरी केले पाहिजे.

Unknown

No comments: