माय मराठी

आज राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत ठरले की, यापुढे टॅक्सीचालकांना परवाने देताना मराठी लिहीता, वाचता येणे जरूरीचे असणार आहे आणि मगच परवाने देण्यात येणार आहेत. खूप दिवसांनंतर अक्कल आली म्हणायची, आता आली हे काय थोडके झाले. सर्व महाराष्ट्र परप्रांतीयांच्या हातात जाण्यापुर्वी हे पाऊल उचलले हेच आम्हां मराठी जनतेवर सरकारचे उपकार झाले म्हणायचे.
आता हाच नियम सर्व क्षेत्रात लागू झाला पाहिजे. R.T.O. अधिकार्‍यांचे एकदां मराठी तपासून पहायला पाहिजे, कारण त्यांना मराठी आलेच पाहिजे. आता यावर काही अतीशहाणे लोक टीका करतील, कारण काही लोकांना संवयच असते फक्त विरोध करायची. सरकारने मनावर घेऊ नये. आता महाराष्ट्रात परप्रांतीयांची संख्या दिवसेदिवस वाढू लागली आहे. त्यातच वेगळ्या विदर्भाच्या हालचाली चालू आहेत. दुसर्‍या प्रांतातले राजकारणी लोकांचा विकास करण्याऐवजी आपलाच विकास साधतात, मग तेथील जनता देशोधडीला लागेल नाहीतर काय? जर त्यांनी त्यांच्या राज्यात उत्पन्नाची साधने निर्माण केली असती तर तेथील जनता परराज्यात, आपला संसार का सोडून आली असती? त्यांना नको वाटते काय आपल्या मुलाबाळांत रहायला. असो आपण त्याचा विचार करून काय उपयोग? पण राज्य सरकारचा निर्णय योग्य आहे. आपल्या घरात जर कोणी घुसखोरी करत असेल तर, कोण सहन करेल? त्याला हुसकावून दिले पाहिजे ना. नाहीतर तो़च आपल्याला घराबाहेर काढेल त्याचे काय? हे आम्हीच मागे एकदा आमच्या ब्लॉगमधून लिहीले होते. मग यांच्यासाठी काहीतरी नियम केलेच पाहिजेत. तसाच प्रकार राज्य सरकारर्ने केला आहे.
मागे एकदा एक ICICI चा ऑफिसर घरी आला होता, काही माहिती देण्यासाठी, तो बोलत होता हिंदीत, इंग्रजीत आणि आम्ही मराठीत. पण तो काही केल्या मराठीत बोलत नव्हता, तर आम्ही त्याला त्याच्या गावाविषयी विचारले तर तो होता दिल्लीकडचा. त्याला मराठी येत नव्हते. आम्ही त्याला सरळ घालवून दिले आणि मराठी शिक आणि मगच आमच्याकडे ये असे खडसावून सांगितले. आम्ही खूप वेळा मुंबईला जाताना पाहिलेय लोक मुंबईत हिंदीतच बोलतात, जरी मराठी येत असेल तरी. आपल्याला वाटते समोरच्याला मराठी येत नाही, पण त्यालासुद्धा तसेच वाटते. लक्षात ठेवा समोरचा कोणत्याही भाषेत बोलू देत आपण मात्र आपली मराठी भाषा सोडायची नाही. अगदी भांडायचे सुद्धां मराठीतच, कारण एकएक इरसाल शिव्या फक्त मराठीतच आहेत. ऐकल्यास अगदी नाकातले केस जळतील. सांगू? नको, ही ती जागा नाही. आपण काय समजून गेला असताल. मराठी कशी मर्दा सारखी वाटते, वाटते नाही आहेच. मराठी बोलतांना कसे मिशीला पीळ दिल्यासारखे वाटते. बाकी भाषा गुळगुळीत दाढीवरून हात फिरवल्यासारख्या वाटतात.
महाराष्ट्र राज्याचे या निमीत्ताने ’ जय हो ’. असाच आपल्या माय मराठीला तिचा पदर ओढणार्‍यांपासून, वस्त्रहरण करणार्‍यांपासून वाचवा.  

Unknown

No comments: